नवी दिल्ली : फ्री व्हाईस आणि डेटा सेवा देऊन रिलायन्स इन्फोकॉमनं ग्राहाकांचा आकडा मार्च 2017 पर्यंत 10 करोडपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.
'फिच रेटिंग'चे संचालक नितीन सोनी यांनी ही भविष्यवाणी केलीय. परंतु, रिलायन्स जेव्हा आपल्या ग्राहकांकडून पैसे वसूल करणं सुरू करेल तेव्हा साहजिकच ही संख्या कमी कमी होत जाईल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय.
सोनी यांच्या म्हणण्यानुसार, जिओनं मोफत व्हाईस आणि डेटा सेवा देऊन चांगलाच गेम केलाय. सध्या जिओकडे जवळपास 5.5 करोड ग्राहक आहेत. येत्या मार्चपर्यंत हा आकडा 10 करोडपर्यंत जाऊ शकतो.
परंतु, सध्या या सेवा मोफत आहेत... जेव्हापर्यंत या सेवा मोफत आहेत तेव्हापर्यंत एअरटेल किंवा आयडियाचे ग्राहक मोफत मिळणारं जिओ सिम वापरतील परंतु, 1 एप्रिलपासून जिओनं पैसे वसुली सुरू केल्यानंतर मात्र हे ग्राहक कमी होत जातील.
जिओनं आपल्या मोफत सुविधेची सुरुवात सप्टेंबर महिन्यात केली होती. सुरुवातीला 31 डिसेंबरपर्यंत व्हाईस आणि डेटा सुविधा मोफत होत्या... परंतु, त्या आता 31 मार्च 2017 पर्यंत वाढवण्यात आल्यात.