इन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!

नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 3, 2013, 12:41 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, अहमदाबाद
नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.
हाच न्याय पत्नीनं राहत्या घरभाडं पतीला देऊन करात सूट मिळविण्यासही लागू आहे. एरवी इन्कम टॅक्सचा बोजा कमी करण्यासाठी असे अनेक जण करतात. मात्र इन्कम टॅक्स रिटर्नची छाननी करून तो मंजूर करणार्या सर्वच अधिकार्यांनना ते पटेल असं नाही, त्यामुळं अनेकांना त्याचा फटका बसतो आणि रिर्टन मिळत नाही. पण आता यावर कोर्टाकडून शिक्कामोर्तब झाल्यानं आपण टॅक्स चोरी नाही, तर योग्य मार्गानं टॅक्स वाचवतोय, असं नोकरदार म्हणू शकतील.
बजरंग प्रसाद रामधारणी या अहमदाबाद इथल्या नोकरदार करदात्यानं वर्ष २००९-१०चा प्राप्तिकर रिटर्न भरताना हीच क्लृप्ती केली होती आणि त्या वर्षात पगारात मिळालेल्या १,११,१६८ रुपये घरभाडं भत्त्यावर प्राप्तिकरातून सूट घेतली होती. पण प्राप्तिकर अधिकार्यां नी ही सूट अमान्य केली होती. त्यांचं म्हणणं होतं, की करदाती व्यक्ती आणि त्यांची पत्नी एकाच घरात राहतात. त्यामुळं त्यांनी त्या घराचं भाडं पत्नीला देतो, असं दाखविणं हा टॅक्स वाचविण्यासाठी आणि तो कमी करण्यासाठी शोधलेली चोरवाट आहे. घरमालक आणि भाडेकरू दोघेही एकाच घरात राहतात, यावरूनच हा व्यवहार प्रामाणिक नाही हे दिसून येतं.
पण रामधारणी यांनी याविरुद्ध केलेलं अपील मंजूर करताना अहमदाबाद इथल्या इन्कम टॅक्स कोर्टानं म्हटलं, की घर पत्नीच्या मालकीचं असल्यानं आणि करदात्यानं तिला भाडं दिल्यानं बँकेच्या रक्कम हस्तांतरणाच्या नोंदींवरून सिद्ध होत असल्यानं इन्कम टॅक्स कायद्याच्या कलम १० (१३ए) नुसार घरभाडं भत्त्यावर सूट मिळण्यास तो पात्र ठरतो.
दरम्यान, चार्टर्ड अकाउन्टंट मंडळींनी या निकालाचं स्वागत केलंय. मात्र वरकरणी लबाडीचा वाटणारा हा व्यवहार कायद्याच्या चौकटीत बसण्यासाठी एक गोष्ट नितांत गरजेची असल्याचं त्यांनी निदर्शनास आणलं. ती गोष्ट म्हणजे तुमचं राहतं घर पूर्णपणे तुमच्या पत्नीच्या नावावर असायला हवं आणि तीही कमावती असायला हवी. कारण ती स्वतंत्र कमाई नसलेली गृहिणी असेल तर कायद्यातील या पळवाटेचा लाभ तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण अशा परिस्थितीत तुमचं आणि पत्नीचं उत्पन्न एकत्रितपणे विचारात घेतलं जातं आणि तुम्ही घरभाड्याची ही सूट मिळविण्यास अपात्र ठरता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.