सावधान... आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करु नका

तुमच्या आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करा, म्हणजे तुम्हाला आयफोनचं वेगळं डिझाईन मिळेल

Updated: Feb 18, 2016, 03:34 PM IST
सावधान... आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करु नका title=

मुंबई: तुमच्या आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 करा, म्हणजे तुम्हाला आयफोनचं वेगळं डिझाईन मिळेल, असा मेसेज तुम्हाला आला असेल तरीही आयफोनची तारिख अजिबात बदलू नका. 

तुम्ही जर आयफोनची तारीख 1 जानेवारी 1970 केली तर तुमचा फोन डब्बा होऊ शकतो. ऍपलची ऑपरेटिंग सिस्टिम आयओएसच्या डेट ऍण्ड टाईम सेटिंग्जमध्ये जो डेट बग आहे त्यामध्ये टेक्निकल फॉल्ट असल्याची तक्रार ऍपलच्या युजर्सनी केली आहे. 

या डेट बगमुळे 64 बिट प्रोसेसर आणि आयओएस 8 आणि 9 वाले आयफोन, आयपॅड आणि आयपॉड खराब होत आहेत. यामध्ये आयफोन 5S, 6, 6S आणि इतर नवी मॉडेल्स, आयपॅड एअर, आयपॅड मिनी 2 यांचा समावेश आहे. 

मॅन्युअली आयफोनची तारीख बदलण कठीण आहे, यासाठी बऱ्याच प्रोसेस आहेत, पण हॅकर्स एका बगच्या माध्यमातून पब्लिक वायफायच्या मदतीनं आयफोनला निशाणा बनवून त्याला डब्बा बनवू शकतात. आयफोनबाबत आलेल्या या तक्रारींमुळे कोणीही तारीख 1 जानेवारी 1970 करु नये असं आवाहन करण्यात येत आहे.  

काय आहे कारण ?

हा टेक्निकल फॉल्ट कशामुळे आला याबाबत मात्र अजून कोणतीही स्पष्टता आलेली नाही. पण असं बोललं जात आहे की आयओएसमध्ये तारीख आणि वेळ स्टोर केली जाते, यामध्ये 1 जानेवारी 1970 चा अर्थ व्हॅल्यू झिरो स्टोर झाली पाहिजे, त्यामुळे टाईम स्टँपवर चालणाऱ्या सगळ्या प्रोसेस फेल होतात.