www.24taas.com, मुंबई
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आयटी क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आईपीओ आणून आज एक नवा इतिहास रचला आहे. आयपीओच्या माध्यमातून कंपनीचं १६ अब्ज डॉलर जमा करण्याचं लक्ष्य आहे. नैस्डॅकमध्ये एफबी सिंबलसह कंपनीनं शेअर्सच्या विक्रीला आजपासून सुरूवात केली. कंपनीनं आयपीओसाठी ३८ डॉलर प्रति शेअर इतकं मूल्य निर्धारित केलं आहे.
या शेअर मुल्याच्या आधारे सोशल नेटवर्क कंपनीचं बाजार मूल्य १०४ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहचलं आहे. मार्क जुकरबर्गच्या नेतृत्वाखालील फेसबुक कंपनीनं ४२.१ कोटी शेअर्स बाजारात आणले आहेत. फेसबुक तसंच शेअरधारक विक्रेत्यांनी इश्यू अंडर राइटर्सला ६ कोटी ३१ लाख ८५ हजार ४२ अतिरिक्त शेअर्स खरेदी करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला आहे.
याशिवाय फेसबुक आयपीओच्या माध्यमातून एकूण १८.४ अब्ज डॉलर्स एकत्र करू शकणार आहेत. २२ मे ला कंपनीची आयपीओ विक्री बंद होणार आहे. १६ अब्ज डॉलर्सच्या आयपीओसह फेसबुकचा आयपीओ अमेरिकेतला आत्तापर्यंतचा तिसरा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. २००८ मध्ये वीजाच्या आयपीओनं १७.९ अब्ज डॉलरसह सर्वात मोठा आयपीओचा मान मिळवला होता.