www.24taas.com, झी मीडिया, खेडा, गुजरात
भाजप भारताचा इतिहास आणि भूगोल बदलवत आहे, या पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आरोपावर नरेंद्र मोदींनी प्रत्युत्तर दिलंय. आपल्या देशाची फाळणी करण्यामागे काँग्रेसच जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप मोदींनी केलाय.
मोदी म्हणाले, “काँग्रेसनं देशाची फाळणी होऊ दिली आणि अशाप्रकारे देशाचा भूगोल बदलला. आपल्या वीर सैन्यांची उपेक्षा करत फक्त नेहरू गांधी घराण्याचं गुणगाण केलं आणि देशाचा इतिहास बदलला.”
नरेंद्र मोदी गुजरातमध्ये एका हॉस्पिटल उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते. “पंतप्रधान महोदय, मला माहिती आहे की, काय बोलायचंय हे तुमच्या हाती नाही. मात्र देशाला माहिती आहे देशाचा भूगोल कोणी बदलला. आपला जन्म ज्या गावात झाला, तो भारताचा भाग होता, मात्र आज नाही” असंही मोदी म्हणाले.
काँग्रेसच्या माथी देशाचं विभाजन केल्याचं पाप आहे. तसंच सध्या चीन वारंवार घुसखोरी करुन आपली जमीन बळकावत आहे. मग अशात सांगा भूगोल कोण बदलतंय, असा सवालही मोदींनी पंतप्रधानांना विचारला. सहा महिन्यांपूर्वी मला पंतप्रधान कार्यालयातून पत्र आलंय की, साबरमतीचा मार्ग ३० किलोमीटर दूर स्थलांतरित करावा, तुम्ही महात्मा गांधींना तर सोडलंच आता त्यांच्या सत्याग्रहाच्या मार्गालाही सोडायचंय का, असं म्हणत मोदींनी पंतप्रधानांवर प्रतिहल्ला चढवला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.