www.24taas.com,झी मीडिया, ठाणे
काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी मुंबईत लोकलने प्रवास केला होता. हाच कित्ता आता राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार गिरवणार आहेत. पवार हे मुंबईत लोकलने प्रवास करणार आहेत.
कळवा मुंब्रा परिसरात विकासकामांचे उद्घाटन आणि महत्त्वकांक्षी प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार रविवारी, १९ मे रोजी ठाणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्यावेळी ते मुंब्रा ते कळवा हा प्रवास लोकलने करणार आहेत.
मुंब्र्यातील विकासकामांची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पवार हे लोकलने प्रवास करणार असल्याचे सांगितले. काश्मिर येथील अनंतनाग जिल्ह्यात अतिरेक्यांशी लढताना ठाण्यातील मेजर मनीष पितांबरे यांना वीरमरण आले होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मिळालेला रणगाडा मुंब्रा स्टेशनसमोरील दर्शनी भागात ठेवण्यात आला आहे, याचे अनावरण करण्यात येणार आहे.
तसेच, सुमारे १८ टन लोखंड वापरून तयार केलेली एम आकाराची कमानही मुंब्रा स्टेशनबाहेर उभारण्यात आली आहे. फेरीवाल्यांसाठी कौसा येथे दोन एकर जागेवर ओपन हॉकर्स प्लाझा उभारण्यात आलाय. आदी कामांचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.