www.24taas.com, झी मीडाया, ठाणे
ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींसाठी क्लस्टर डेव्हलपमेंन्टच्या मागणीसाठी राजकारण तापू लागलंय. क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी राष्ट्रवादी उपोषण करणार असून या मागणीसाठी शिवसेना आज टेंभिनाका ते मंत्रालय असा लाँगमार्च काढणार आहे तर मनसेनंही आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. पोलिसांनी मात्र शिवसेनेच्या मोर्चाला परवानगी नाकारलीय. शिवसेना मात्र आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे ठाण्यात तणावाची परिस्थिती आहे.
मुबईनंतर वाढणारं शहर म्हणजे ठाणे... मात्र, गेल्या पाच महिन्यात ठाण्यात तीन इमारती पत्यांसारख्या कोसळल्या. यात ८७ जणांना आपला जीव गमवावा लागला. हा प्रश्न ठाणेकरांसाठी मोठा झाला आणि सुरू झाली आपली वोट बँक वाचवण्यासाठी राजकीय पक्षांची धडपड... प्रथम राष्ट्रवादीनं ४ तारेखेपासून ‘क्लस्टर डेवलोपमेन्ट’च्या मागणीसाठी आमरण उपोषण करण्याचे ठरवलं. सरकारमध्ये असूनसुद्धा सरकारला गतिमान करण्यासाठी राष्ट्रवादी आता चक्क मित्रपक्षालाच धारेवर धरणार आहे.
राष्ट्रवादीला शह देण्यासाठी शिवसेनेनंही यात उडी घेतलीय आणि टेंभिनाका ते मंत्रालय या भव्य लाँगमार्चचं आयोजन केलं. झोपलेल्या सरकारला जागं करणं आणि निष्पाप बळींबद्दल जाब विचारणं हा सेनेच्या लाँगमार्चचा उद्देश असल्याचं सेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय.
दरम्यान, क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी केलेल्या सर्वपक्षीय बंदपासून मागे रहाणाऱ्या मनसेनंही आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. पोलिसांनी याबाबत परवानगी नाकारली तर आंदोलन करून जेलमध्ये उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसेचे ठाणे शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी दिलाय.
क्लस्टर डेव्हलपमेंट होणारच आहे. मात्र ठाणे पालिकने याबाबतचा रिपोर्ट अजूनही आपल्याकडे पाठवला नसल्याचं स्पष्ट केलंय. तेव्हा यात सरकारचा किंवा मुख्यमंत्र्यांचा दोष नसून हा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे परिसरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट सुरू होता. मात्र, केवळ वोट बँक वाचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत होते. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांची चाललेली ही धडपड पाहाता क्लस्टर डेव्हलपमेंट हवं पण राजकारण नको असं म्हणण्याची वेळ आता ठाणेकरांवर आलीय.
व्हिडिओ पाहा : क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे नक्की... पाहुयात व्हिडिओच्या माध्यमातून
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.