www.24taas.com,नवी मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबई महापालिकेच्या अभियंत्याला धमकी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पामबीज येथील एका अनधिकृत इमारतीचे दोन मजले पाडण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यावर कारवाई करू नये म्हणून आव्हाड यांनी फोनवर धमकावले होते. पाम टॉवरमध्ये जवळपास दीड हजार मीटर अनधिकृत बांधकाम झाले आहे.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने या टॉवरवर कारवाईची तयारी सुरू केली आहे. मात्र या कारवाईची कुणकुण लागल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेचे अभियंता अवधूत मोरे यांना फोन वरून धमकी दिली. तुला बघून घेईन. हा फोन रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आल्याचे मोरे यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, असे मोरे यांनी सांगितले.
आव्हाड यांनी या इमारतीत माझ्या नातेवाईकांचे दोन फ्लॅट आहेत. त्यामुळे मी पालिकेच्या हलचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जर या इमारतीवर कारवाई झाली तर परिणाम वाईट होतील, असे आव्हाड यांनी मोरे यांना धमकावल्याचे मोरे यांनी सांगितले आहे. अवधूत मोरे हे माजी सभागृहनेते आणि विद्यमान नगरसेवक विठ्ठल मोरे यांचे चिरंजीव आहेत.