www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
ठाण्यात एका ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या अबू सालेम टोळीतील एका सराईत गुन्हेगाराला नौपाडा पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. राजेश हातणकर असे या गुन्हेगाराचे नाव असून त्याच्यावर खुनाचे १५ गुन्हे दाखल आहेत. तर रॉबरीचे १० गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी चरईमध्ये झालेल्या चोरीतील सीसीटीव्हीच्या चित्रीकरणाच्या आधारावर हातणकर याची ओळख पटली आहे. यामध्ये दोन आरोपीना अटक केली असून तीन आरोपी मात्र फरार आहेत.
दोन दिवसांपूर्वी चरई येथील गणेश ज्वेलर्स या दुकानावर काही दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडा टाकून आरोपी पळून जाण्यामध्ये यशस्वी झाले होते. या सर्व आरोपींच्या शोधात असणाऱ्या नौपाडा पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. नौपाडा येथील क्रांती ज्वेलर्सवर काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी आधीच या परिसरामध्ये सापळा रचला होता. दरोडा टाकण्यासाठी पाचही आरोपी क्रांती ज्वेलर्समध्ये येताच पोलिसांनी त्यांना अटक केली. यामध्ये अबु सालीम टोळीतील राजेश हातणकर याला अटक केली असून त्याच्या सोबत असलेल्या सचिन केदार याला देखील अटक करण्यात आली आहे. मात्र तिघे आरोपी पोलिसांच्या हातून निसटण्यात यशस्वी झाले.
या दोन्ही आरोपींकडून गावठी रिव्हॉल्वर आणि चाकू असे हत्यार हस्तगत करण्यात आले आहे. अबू सालेम टोळीतील राजेश हातणकर यांच्या मुंबई, आणि ठाणे शहरामध्ये १५ खुनाचे आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी चरईमध्ये टाकण्यात आलेला दरोडा याच आरोपींना टाकला असल्याचे तपासामध्ये उघड झाले आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर हातणकर याची ओळख पटली आहे अशी माहिती नौपाडा पोलिस यांनी दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.