www.24taas.com, मुंबई
‘टेक्स ग्रुप चॅट’वर तुम्ही तासनतास घालवले असतील ना... पण, हीच मजा व्हिडिओसहीत मिळाली तर! अहो, तुमची हीच हाक गुगलनंही ऐकलीय आणि तुमची ही इच्छा त्यांनी पूर्णही केलीय. त्यामुळे ‘ग्रुप चॅट’ तेही व्हिडिओवर करण्याची मज्जा तुम्ही गुगलवर लुटू शकता.
गुगलनं नुकतंच आपलं ग्रुप व्हिडीओ चॅटिंग हँगआऊट सेवा भारतीय युजर्ससाठी लॉन्च केलीय. त्यासाठी तुमच्याकडे असायला हवं फक्त जी टॉक आणि कम्प्युटरवर व्हिडिओ कॅमेऱ्याची सोय... गुगलच्या या नव्या सुविधेमुळे आपण एकाच वेळी नऊ जणांशी बोलू शकणार आहोत. ही सेवा वापरण्यासाठी युजर्सनी केवळ जी टॉकच्या पॅनल शेजारी असलेल्या व्हिडीओ कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक करायचंय. यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचे गुगल प्लसवरचे सगळे फ्रेंडस् दिसतील आणि तुमचे मित्र गुगल प्लसवर नसतील तरी वांदा नाय... त्यांचा जी-मेल आयडीच्या साहाय्यानेही तुम्ही त्यांना तुमच्या ग्रुप व्हिडिओ चॅटमध्ये सहभागी करून घेऊ शकता. तसंच हे चॅट आपण हँग आऊट या फिचरचा वापर करून सर्वांसाठी खुले करू शकतो. फक्त यासाठी लागेल तुमचं यू ट्यूब अकाऊंट... यानंतर ते चॅट ब्रॉडकास्ट होताना दिसेल. आपण त्या ग्रुपमध्ये करत असलेल्या विविध चर्चा आपल्या फोटोसह सर्वांना पाहवयास मिळतील.
जी मेलच्या विंडोच्या डाव्या बाजूला चॅट्स, स्क्रीनशेअर, गुगल ड्राइव्ह, गुगल डॉक्स, इफेक्ट्स आणि पिंग पाँग हँगआऊट असे पर्याय दिसू लागतील. चॅट आणि हँगआऊटच्या माध्यमातून मित्रांना मेसेजेसही पाठवता येणार आहेत. तर स्क्रीनशेअर या सुविधेत मित्रांशी स्क्रीनशॉट शेअर करता येणार आहेत. हे शेअर केल्यावर आपल्या ग्रुपमधील सर्वांनाच तो व्हिडीओही पाहता येईल. मजा म्हणजे हॅँगआऊटमध्ये तुम्ही गेमही खेळू शकता.