`सॅमसंग` विरुद्ध `अॅपल` : `पेटंट`वरून दोघांनाही दंड

अमेरिकेच्या एका न्यायालयानं, ‘अॅपल’च्या दोन पेटंटच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगला 12 करोड डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 3, 2014, 06:24 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, कॅलिफोर्निया
अमेरिकेच्या एका न्यायालयानं, ‘अॅपल’च्या दोन पेटंटच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सॅमसंगला 12 करोड डॉलरची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिलाय. कॅलिफोर्नियामध्ये सेंट जॉन यांच्या फेडरल कोर्टानं शुक्रवारी हा निर्णय सुनावलाय. यामुळे सॅमसंगला चांगलाच हादरा बसलाय.
कोर्टानं दोन कंपन्यांच्यावतीनं दाखल केलेल्या केसेसमध्ये हा निर्णय सुनावलाय. ‘अॅपल’नंही सॅमसंगच्या पेटेंटचं उल्लंघन केलंय, अशावेळी अॅपलनं सॅमसंगला नुकसान भरपाई म्हणून एक लाख 58 हजार डॉलरची रक्कम सॅमसंगला द्यावी, असंदेखील यावेळी कोर्टानं नमूद केलंय.
अॅपलनं सॅमसंगवर आपल्या दोन पेटेंटचं उल्लंघन करण्याचा आरोप केला होता. या पेटेंटमध्ये ‘स्लाईड टू अनलॉक’सारख्या फंक्शनचाही समावेश आहे. याच्या बदल्यात अॅपलनं सॅमसंगला भरपाई म्हणून दोन अरब 20 करोड डॉलरची मागणी केली होती.
तर दुसरीकडे सॅमसंगनंही या आरोपांना धुडकावून लावत अॅपलकडे 60 लाख डॉलरची मागणी केली होती. यावेळी, सॅमसंगनं अॅपलवर कॅमेरा आणि व्हिडिओ प्रसारणाशी निगडीत आपल्या दोन पेटेंटचं उल्लंघन करण्याचा आरोप केला होता.
गेल्या काही वर्षांपासून अॅपल आणि सॅमसंग या दोन कंपन्यांमध्ये अनेक देशांत पेटेंटची न्यायालयीन लढाई सुरू आहे. दोन वर्षांपूर्वी, आणखी एका न्यायाधीशांनी सॅमसंगला अॅपलच्या पेटंटचं उल्लंघन केल्याप्रकरणी 93 करोड डॉलरची नुकसान भरपाई करण्याचा आदेश दिला होता. या निर्णयाविरोधात सॅमसंग पुन्हा एकदा आव्हान देणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.