www.24taas.com, बार्सिलोना
नोकियाने आज चार नवे हॅण्डसेट सादर केले आहेत. यात नोकियाचा सर्वांत स्वस्त मोबाइलही आहे. या मोबाइल किंमत फक्त १,१०० रुपये आहे. याशिवाय नोकियाने आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलिओचाही विस्तार केला आहे. याद्वारे सॅमसंग आणि ऍपलमुळे गमावलेली आपली बाजारपेठ पुन्हा मिळवण्याची नोकियाला आशा आहे.
नोकिया १०५ हा आत्तापर्यंतचा सर्वांत स्वस्त हँडसेट असेल. या मोबाइलमध्ये कलर स्क्रीन, एफएम रेडिओ आणि डस्ट प्रूफ कीपॅड आहे. भारतात या मोबाइलची किंमत १,२५० रुपये आहे. नव्या मोबाइल्सचा वापर व्यापार उद्योगाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर होईल अशी नोकियाचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन इलाप यांना आशा आहे.
भारतीय बाजारपेठेत नोकियाचे स्वस्त हॅण्डसेट फारसे विकले जात नसल्याचं दिसून आलं आहे. भारतीय बाजारात प्रामुख्याने वेगवेगळी फिचर्स असणारे फोन खरेदी केले जातात. मल्टीमीडिया फोन्सची विक्री सुमारे ९४% होत असल्याचं दिसून आलं आहे. मोबाइल्सच्या बाबतीत अजूनही नोकियाच भारतात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र सॅमसंग, मायक्रोमॅक्स या कंपन्यांनी बरीच भारतीय बाजारपेठ काबिज केली आहे.