शिक्षणाचा नवा अजेंडा, विद्यार्थ्यांचा हिरवा `झेंडा`

एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 13, 2012, 08:13 PM IST

www.24taas.com, औरंगाबाद
एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..
औरंगाबादपासून जवळच असलेल्या माळीवाड्यातील जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी एक आगळीवेगळी शक्कल लढवलीय. या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक वर्गासमोर हिरवे, पिवळे, लाल झेंडे लावल्या जातात. त्यामुळं गावकऱ्यांनासुद्धा कुठल्या वर्गात किती मुलांची उपस्थिती आहे याची माहिती मिळते. त्यामुळं पालकसुद्धा आता आपल्या मुलांना रोजच शाळेत पाठवतात. शाळेत शंभऱ टक्के उपस्थिती असणाऱ्या वर्गासमोर हिरवा झेंडा लावला जातो. तर ९० टक्के हजेरी असणा-या वर्गासमोर पिवळा झेंडा आणि ८० टक्के किंवा त्यापेक्षा कमी असणा-या वर्गासमोर खतरे की निशाणी लाल झेंडा लावला जातो.. यामुळं शिक्षक आणि विद्यार्थीसुद्धा आपल्या वर्गासमोर हिरवा झेंडा कायम राहावा यासाठी प्रयत्न करतात..
इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी गोडी वाढावी म्हणून प्रोजेक्टरच्या माध्यमातून पर्य़टन, ऐतिहासिक स्थळे, आणि थोर समाजसेवकांची माहिती देण्यात येते. शाळेच्या या आधुनिकीकरणामुळे मुलांमध्येसुद्धा आनंद आहे आणि झेंडा मिळवण्यासाठी तर मुलांमध्ये चांगलीच चढाओढ असते. सर्वांच्या सहकार्यानं माळीवाड्याच्या या शाळेनं आता कात टाकलीय.. अत्याधुनिक उपकरणांसह उपस्थिती वाढवण्यासाठी शाळेच्या या उपक्रमाचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय.