www.24taas.com, कोलंबो
टी-20 वर्ल्डकपमधील सुपर एटचा सामना गमवल्यानंतर आता कॅप्टन धोनीही चिंतेत पडला आहे. आता मात्र तो चांगलाच खडबडून जागा झाला आहे. आता करा किंवा मरा असाच संदेश त्यांनी संघ सहकाऱ्यांना दिला आहे. स्पर्धेत आव्हान कायम राखण्यासाठी आज भारताला विजय मिळविणे आवश्यक आहे. करा किंवा मरा, अशी स्थिती असलेल्या या सामन्यात भारतासमोर आव्हान कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचे आव्हान आहे. पाकिस्तानचा संघ फॉर्मात आहे. त्यामुळे आज धोनी ब्रिगेडची अग्निपरीक्षाच आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील मुकाबला म्हणजे जणूकाही महायुद्धच...जेव्हा-जेव्हा हे पारंपारिक शत्रू आमने-सामने येतात तेव्हा-तेव्हा दोन्ही देशवासियांसाठी ती प्रतिष्ठेची लढाई असते. म्हणूनच भारत-पाकिस्तानमधील क्रिकेटचा मुकाबला हा फायनल किंवा इतर कोणत्याही मोठ्या स्पर्धेपेक्षा महत्त्वाचा ठरतो.टी-20वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकल्यास जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान यांच्यात मुकाबला झालाय तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.
2007मध्ये झालेल्या पहिल्या-वहिल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान दोन मॅचेस झाल्या. या दोन्हीही लढतींमध्ये भारताने बाजी मारलीय. लीग मॅचमध्ये बोलआऊट मध्ये भारताने विजय खेचून आणला. तर रंगतदार झालेल्या फायनलमध्ये भारताने 5 रन्सने पाकिस्तानवर मात करत वर्ल्ड कपवर नाव कोरल. यानंतर झालेल्या दोन वर्ल्ड कपमध्ये एकदाही भारत-पाक मुकाबला झाला नाही.