भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश!

नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. 

Updated: Nov 17, 2014, 07:59 AM IST
भारताकडून पहिल्यांदाच श्रीलंकेला ‘विराट’वॉश! title=

रांची : नियमित कणर्धार महेंद्रसिंग धोनीचे आपणच खरे वारसदार असल्याचं सिध्द करत विराट कोहलीनं आपल्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका संघाला वनडे मालिकेत ‘विराट’ वॉश दिला. पाच सामन्यांची ही मालिका भारतानं ५-० अशी जिंकली. रविवारी झालेल्या पाचव्या वन-डे सामन्यात श्रीलंकेचा ३ गडी आणि ८ चेंडू राखून पराभव केला. 

कर्णधार विराट कोहलीच्या (नाबाद १३९ धावा, १२६ चेंडू, १२ चौकार, ३ षट्कार) शतकी खेळीच्या जोरावर भारतानं हा विजय साकारला. श्रीलंकेचा कर्णधार अँजेलो मॅथ्यूजची (नाबाद १३९) शतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.

भारतानं श्रीलंकेचा डाव ८ बाद २८६ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा ४८.४ षटकांत ७ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. भारताच्या विजयात विराट कोहलीसह अंबाती रायडू (५९ धावा, ८ चौकार, १ षट्कार) याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. मेंडिसनं चार बळी घेत रंगत निर्माण केली होती, पण कोहलीनं संयमी फलंदाजी करीत भारताचा विजय निश्चित केला.

त्याआधी कर्णधार मॅथ्यूजच्या वन-डे क्रिकेट कारकिर्दीतील पहिल्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेनं ८ बाद २८६ धावांची आव्हानात्मक मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या श्रीलंकेची एकवेळ १८.३ षटकांत ४ बाद ८५ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मॅथ्यूजनं डाव सावरताना श्रीलंकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. मॅथ्यूजनं ११६ चेंडूंना सामोरं जाताना १० षट्कार आणि ६ चौकारांच्या साहाय्यानं नाबाद १३९ धावा फटकाविल्या. मॅथ्यूजनं थिरिमानेसोबत पाचव्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. 
थिरिमाननं ७६ चेंडूंना सामोरे जाताना २ चौकार आणि १ षट्काराच्या साहाय्यानं ५२ धावा फटकाविल्या. धवल कुलकर्णीनं अखेरच्या षटकात केवळ ४ धावा दिल्यामुळं लंकेला ३०० धावांचा पल्ला ओलांडण्यात अपयश आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.