'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं'

सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.

Updated: Nov 4, 2014, 06:06 PM IST
'सौरवनं तयार केलेलं टीम स्पिरिट चॅपलनं उद्ध्वस्त केलं' title=

नवी दिल्ली : सचिन तेंडुलकरनं ग्रेग चॅपल यांना ‘रिंगमास्टर कोच’ असल्याचं सांगितल्यानंतर आता सचिनचा तेव्हाचा साथीदार आणि सीनियर ऑफ स्पिनर हरभजन सिंगही याबद्दल बोलण्यासाठी पुढे आलाय.

चॅपल यांनी भारतीय क्रिकेटला इतकं नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला की पुन्हा रुळावर येण्यासाठी तीन वर्ष लागले, असं हरभजननं म्हटलंय. सर्वात वाईट गोष्ट ही होती की टीममधले काही खेळाडू कोचसमोर नतमस्तक झाले होते आणि ते या ऑस्ट्रेलियन कोचला काही चुकीची माहिती देत होते... त्यामुळे मतभेद वाढत होते, असंही भज्जीनं म्हटलंय. 

काही खेळाडू आपल्या फायद्यासाठी चॅपल यांचा वापर करत होते का? असा प्रश्न विचारण्यात आल्यावर योग्य वेळ येईल तेव्हा नावांचा खुलासा होईलच, असंही भज्जी म्हणतोय. 

भारतीय टीम जेव्हा झिम्बॉब्वेविरुद्ध बुलावायोमध्ये टेस्ट मॅच खेळत होती तेव्हा चॅपलनं तत्कालीन कॅप्टन सौरव गांगुली याच्याविरुद्ध बीसीसीआयला एक ई-मेल धाडला होता. ‘सौरव परत आल्यानंतर मी सौरवला या ई-मेलबद्दल सांगितलं तेव्हा तोही या गोष्टीबद्दल अनभिज्ञ असल्याचं जाणवलं, तोही माझ्याइतकाच हैराण होता... चॅपलला सात खेळाडूंशी बदला घ्यायचा होता. सौरव त्याच्या मुख्य निशाण्यावर होता. त्यानंतर मी, वीरेंद्र सेहवाग, आशीष नेहरा, झहीर खान आणि युवराज सिंहचा नंबर होता, असंही हरभजननं म्हटलंय. 

आम्हाला आमच्या टीममधील खेळाडूंवरच विश्वास उरला नव्हता. परदेश दौऱ्यावर जात होतो तेव्हा आम्हाला एकमेकांची भीती वाटायची. आम्ही आमच्या भावना, दु:ख किंवा निराशाही प्रकट करू शकत नव्हतो कारण आम्हाला एकमेकांवर भरवसाच नव्हता... चॅपपला भारताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढच्या स्तरावर घेऊन जायचं होतं पण ती वेळ अशी होती जेव्हा आम्ही अंडर-14 टीमसारखं खेळत होतो, असं म्हणत हरभजननं चॅपल यांच्यावर घणाघाती टीका केलीय.

‘सौरवनं 2001 ते 2005 पर्यंत भारतीय टीमला तयार केलं होतं. चॅपलनं हे टीम स्पिरीट संपूर्णत: उद्ध्वस्त केली. तो खेळाडुंचा वापर एकमेकांविरुद्ध करत होता. बीसीसीआयच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचाही उपयोग तो आपल्या गरजेप्रमाणे करत होता. त्यानं एक असं वातावरण तयार केलं होतं जे आता कुणालाच आठवायचं नाहीय. तो स्वत:सोबत सगळी नकारात्मकता घेऊन आला होता’ असंही भज्जीनं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.