रेसिफ: 2014च्या वर्ल्डकपमध्ये कोस्टा रिका सरप्राईज पॅकेज ठरली आहे. आता नॉक आऊट राऊंडमध्ये कोस्टा रिकाला ग्रीसचं आव्हान मोडित काढावा लागेल. ग्रीसविरुद्ध त्यांच्या टीमलाच सर्वाधिक पसंती देण्यात येतेय. त्यामुळं क्वार्टर फायनलमध्ये पहिल्यांदाच दिमाखात प्रवेश करण्यासाठी कोस्टा रिकाची टीम आतूर असेल.
हा सामना आधी निर्धारित वेळेत आणि मग जादा वेळेतही 1-1 असा बरोबरीत सुटला होता. त्यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये कोस्टा रिकाचा गोलरक्षक नवासनं उत्तम बचाव केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये कोस्टा रिकाकडून बोर्जेस, ब्रायन रुईज, गोन्झालेझ आणि कॅम्पबेलनं पहिले चार गोल केले. तर ग्रीससाठी मित्रोग्लू, लाझारोस आणि कोलेवसनं पहिले तीन गोल झळकावले.
मात्र चौथ्या प्रयत्नात ग्रीसच्या जेकसची किक नवासनं सहज थोपवली. त्यामुळं कोस्टा रिकाला 4-3 अशी आघाडी मिळाली. मग मायकल उमान्यानं पाचव्या आणि अखेरच्या प्रयत्नात गोल डागला आणि कोस्टा रिकाच्या 5-3 अशा विजयावर शिक्कामोर्तब केलं.
मॅचमध्ये ब्रायन रुईजनं 52व्या मिनिटाला गोल करत कोस्टा रिकाला आघाडी मिळवून दिली होती. मात्र कोस्टा रिकाच्या दुआर्तेला 66व्या मिनिटाला रेड कार्ड दाखवण्यात आलं. त्यामुळं जवळपास तासभर कोस्टा रिकाला दहा खेळाडूंसहच खेळावं लागलं. पापास्थाथॉपुलोसनं 91व्या मिनिटाला गोल करत ग्रीसला बरोबरी साधून दिली.
दरम्यान, कोस्टा रिकानं या विजयासोबतच विश्वचषकात पहिल्यांदाच क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली. क्वार्टर फायनलमध्ये कोस्टा रिकाचा सामना नेदरलँड्ससोबत होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.