नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचा सामना म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. यंदाचा वर्ल्डकप भारतात होतोय. या वर्ल्डकपमध्ये भारताचा दुसरा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची उत्सुकता सर्वच क्रिकेट रसिकांना लागलीये. मात्र क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक बातमी आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकपसाठी भारतात येऊ शकणार नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येतेय. सरकारच्या निर्णयावर पाकिस्तानचा वर्ल्डकपमधील सहभाग अवलंबून असल्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान सांगितले.
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान सरकार संघाला भारतात खेळण्याची परवानगी कदाचित देणार नाही. जर सरकारकडून परवानगी मिळाली नाही तर हा सामना दुबई, शारजाह अथवा कोलंबो या ठिकाणी होऊ शकतो, असं सदस्यांचे म्हणणे आहे.
रिपोर्टनुसार, शहरयार यांनी भारतात खेळण्यासाठी पाकिस्तान टीमला धोका असल्याचे आयसीसी सदस्यांना यापूर्वीच सांगितलेय. गेल्या काही महिन्यांत अशा काही घटना घडल्यात ज्यामुळे भारतात खेळण्यासाठी धोका वाढलाय. पुढील महिन्याक ८ मार्चपासून वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होतेय. तीन एप्रिलपर्यंत ही स्पर्धा सुरु राहणार आहे.