नवी दिल्ली : भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. दिल्लीमध्ये सुर असलेल्या कसोटीत पहिल्या डावात रहाणेने कसोटी कारकिर्दीतील पाचवे आणि घरच्या मैदानावर पहिले शतक लगावले. पहिल्या २२ टेस्टमध्ये पाच शतक ठोकण्याची किमया फार कमी क्रिकेटपटूंनी केलीय. यात अजिंक्यच्या नावाचाही आता समावेश झालाय. मात्र हे शक्य झाले सचिनच्या एका एसएमएसने. या एसएमएसने रहाणेचे करिअर बदलून टाकले.
४ डिसेंबर २०१५ ही तारीख रहाणे कधीच विसरु शकत नाही. या दिवशी घरच्या मैदानावर त्याने पहिलेवहिले शतक ठोकले. तेही अव्वल आफ्रिकेच्या संघाविरुद्ध. २२व्या कसोटीत त्याने हे शतक केले. मात्र सचिनची शिकवण त्याच्यासोबत नसती तर कदाचित तो इतका यशस्वी नसता.
दोन वर्षांपूर्वी २९ डिसेंबर २०१३मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बनमध्ये पहिल्याच कसोटीत रहाणेचे शतक अवघ्या चार धावांनी हुकले होते. त्या रात्री रहाणेला एक मेसेज आला. तो मेसेज होता सचिन तेंडुलकरचा. सचिनने लिहिले होते की, आता तुला समजेल की टेस्ट क्रिकेट काय असते. शतकाची किंमत केवढी मोठी असते. यावर रहाणेने उत्तर देताना म्हटले, सचिनसर शतकासाठी मी तुम्हाला अधिक वेळ वाट पाहू देणार नाही. त्यानंतर दोनच महिन्यांत रहाणेने न्यूझीलंडमध्ये पहिले शतक साधले. त्यानंतर त्याची गाडी वेगात सुरु आहे. लॉर्डसमध्ये त्याने शतक केले. मेलबर्नमध्ये सेंच्युरी केली. त्यानंतर कोलंबो आणि आता दिल्लीतही त्याने खणखणीत शतक साजरे केले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या यापूर्वीच्या दोन कसोटींमध्ये एकाही भारतीय क्रिकेटरला शतक ठोकता आले नव्हते. मात्र चौथ्या कसोटीत रहाणेने ही किमया साधली. त्याने २१५ चेंडूत ११चौकार आणि ४ षटकांरांसह १२७ धावांची खेळी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.