धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

Updated: Aug 18, 2014, 01:12 PM IST
धोनी कॅप्टन्सी सोडणार? पराभवानंतर दिले संकेत title=

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-१ असा दारुण पराभव स्वीकाराव्या लागलेल्या टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं आता कर्णधारपद सोडण्याचे संकेत दिले आहे. या पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? या प्रश्नावर उत्तर देताना 'आणखी थोडा वेळ प्रतिक्षा करा' असं सूचक विधान महेंद्रसिंह धोनीनं केलंय. 

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या तिन्ही टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाला लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर महेंद्रसिंह धोनीनं सामन्यानंतर पत्रकार परिषद घेतली. या दारुण पराभवानंतर कर्णधारपद सोडणार का? असा प्रश्न धोनीला पत्रकारांनी विचारला. 'या पराभवातून पुन्हा नव्या दमानं उभं राहण्यास मी सक्षम आहे की, नाही हे बघण्यासाठी तुम्हाला आणखी काही वेळ प्रतिक्षा करावी लागेल' असं सूचक उत्तर धोनीनं केलंय. भारतीय कसोटी संघाचा कर्णधार म्हणून खूप काम केलंय का? या प्रश्नावरही त्यानं 'बहुतेक, हो' असं उत्तर दिलं. 

शेवटच्या तीन मॅचमध्ये प्रतिस्पर्धी टीमला टक्कर देण्यात सपशेल अपयशी ठरल्यानं आम्ही खूप निराश आहोत असं धोनी म्हणाला. तीन दिवसाच्या आतच हा सामना संपल्यावर धोनीनं बॅट्समननंही सुनावलं. 'भारतीय फलंदाजांच्या सुमार कामगिरीचं हे प्रतिबिंब आहे' असं धोनीनं म्हटलंय. २०११मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघानं लागोपाठ आठ कसोटी सामने गमावले आहेत. तर २०१३-१४मध्ये दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यामध्येही भारताची पराभवाची मालिका सुरुच आहे. 

मुरली विजयनं चांगली फलंदाजी केली. पण सलामीची जोडी दमदार सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरत होती. त्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर येणारा फलंदाज हा सामन्याच्या पहिल्या पाच षटकाच्या आतच मैदानात यायचा. विराट कोहलीलाही सूर सापडला नाही, असं धोनीनं स्पष्ट केलं. सहा फलंदाज घेऊन खेळत असताना झटपट विकेट गेल्यास त्याचा फटका संघाला बसतो. तळाच्या फलंदाज खेळल्यास संघानं ३००ची मजल गाठली आणि तेही बाद झाल्यास संघ धावा करण्यासाठी झटत होता असं विश्लेषण धोनी मांडतो. भुवनेश्वर कुमार हा भारताचा एकमेव खेळाडू आहे जो संपूर्ण मालिकेत सातत्त्यानं चांगली कामगिरी करत होता, असं सांगत धोनीनं भुवनेश्वरचं कौतुक केलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.