हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा

आपल्याला साखर म्हणजे आरोग्यासाठी धोकादायक असेचं माहित आहे. गोड खाणं अनेकांच्या मते वजन वाढवणं, मधुमेह, हृदयविकार यांसारख्या आजारांना कारणीभूत ठरतं. परंतु अलीकडेच एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की योग्य प्रमाणात गोड खाल्ल्यास  हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतं.

Intern | Updated: Dec 19, 2024, 04:01 PM IST
हृदयाला आरोग्यदायी ठेवण्याचा नवा मंत्र, 'थोडं गोड खा आणि निरोगी राहा title=

गोड खाण्याचा हृदयावर होणारा परिणाम
साखर शरीरासाठी चांगली किंवा वाईट ठरणं हे आपण कोणत्या स्वरूपात साखर घेतो त्यावर अवलंबून आहे. शीतपेयांमध्ये असणारी साखर त्वरीत पचते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढवते. यामुळे हृदयावर अतिरिक्त दबाव येतो. याउलट, मिठाई, चॉकलेट किंवा मधामधून मिळणारी साखर हळूहळू पचते, त्यामुळे शरीरावर आणि हृदयावर अचानक ताण येत नाही.  

संशोधनातून काय समोर आलं?
'फ्रंटियर्स इन पब्लिक हेल्थ' या जर्नलमध्ये प्रकाशित एका संशोधनातून सुमारे 70,000 लोकांच्या आहार आणि जीवनशैलीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासानुसार, ज्या लोकांना त्यांच्या एकूण कॅलरीजपैकी 7.5% कॅलरीज मिठाईमधून मिळतात, त्यांचे हृदय निरोगी असल्याचे दिसून आले. या निष्कर्षात असेही दिसून आले की गोड खाणं टाळणाऱ्या किंवा जास्त प्रमाणात साखर घेणाऱ्या लोकांच्या तुलनेत कमी प्रमाणात गोड खाणारे अधिक निरोगी असतात.  

'फिका' परंपरेचा उल्लेख  
स्वीडनमध्ये 'फिका' नावाची एक परंपरा आहे, जिथे लोक गोड पदार्थांसह कॉफीचा आस्वाद घेण्यासाछी एकत्र येतात. ही परंपरा फक्त सामाजिक आयुष्य सुधारत नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही फायदेशीर ठरते. अशा सवयींमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.  

साखर का फायदेशीर आहे?
संशोधकांच्या मते मिठाईसारख्या पदार्थांमधील साखर शरीराला ऊर्जा देते आणि ती हळूहळू पचवल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढत नाही. यामुळे हृदयावर अनावश्यक दबाव पडत नाही. दुसरीकडे, शीतपेय किंवा प्रक्रिया केलेल्या पदार्थांमधील साखर पटकन पचते ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.  

साखरेचं योग्य प्रमाण किती असावं?
तज्ज्ञांच्या मते दररोज 25 ते 37.5 ग्रॅम साखर म्हणजेचं 5-7.5% कॅलरीज घेतल्यास ते आरोग्यासाठी सुरक्षित आहे. परंतु अमेरिकेत लोक 71 ग्रॅम साखर दररोज घेतात, ज्यामुळे वजन वाढणे आणि हृदयविकारासारख्या समस्या निर्माण होतात.  

संतुलित साखरेचा वापर हृदयासाठी उपयुक्त 
साखर पूर्णपणे टाळण्याऐवजी ती योग्य प्रमाणात आणि योग्य स्वरूपात खाल्ली तर ती हृदयासाठी फायदेशीर ठरते. मिठाई, चॉकलेट, मध यांसारखे नैसर्गिक पर्याय स्वीकारले तर ते हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकतात. त्यामुळे गोड खाण्याबाबत भीती बाळगण्याची गरज नाही, फक्त प्रमाण सांभाळणं महत्त्वाचं आहे.

(Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )