मोहाली: आजपासून मोहालीमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टेस्ट सीरिजला सुरुवात होत आहे. टी-२० आणि वन-डे सीरिज गमावल्यानंतर आता निदान टेस्ट सीरिजमध्ये तरी टीम इंडियानं विजय साकारावा अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट फॅन्स बाळगून आहेत.
टीम इंडियाचा स्पिनर आर. अश्विन दुखापतीतून सावरला असून त्यानं टीममध्ये कमबॅक केलंय. मोहालीच्या ड्राय पिचवर टीम इंडियाची मदार प्रामुख्यानं स्पिनरवर असणार आहे. आर. अश्विनच्या जोडीला टेस्ट टीममध्ये कमबॅक केलेला रवींद्र जाडेजा आणि अमित मिश्रा असतील. तर श्रीलंका दौऱ्यावर अती आक्रमकता दाखवलेला ईशांत शर्मा प्रॅक्टीस सेशनला दिसला नसल्यानं त्याबाबत चर्चा आहे.
ओपनिंगला शिखर धवनसह मुरली विजय, रोहित शर्मा आणि के.एल. राहुल यांच्यामध्ये चांगलीच चुरस आहे. तर मिडल ऑर्डरला विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेवर जबाबदारी असेल.
दुसरीकडे टेस्टमध्ये वर्ल्ड नंबर असलेली दक्षिण आफ्रिका कागदावर मजबूत दिसतेय. त्यांच्याकडे डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल हे स्पीड स्टार असून इम्रान ताहीरची स्पिन बॉलिंगही आहे. या तिघांकडूनही भारतीय बॅट्समनला चांगलाच धोका आहे. तर खुद्द कॅप्टन हाशिम आमला, एबी.डिविलियर्स, फॅक ड्यू प्लेसिस या बॅट्समनला रोखण्याचं आव्हान भारतीय बॉलर्ससमोर असेल. आता पहिल्या टेस्टमध्ये कोण बाजी मारतं याकडे क्रिकेट फॅन्सचं लक्ष लागून राहिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.