नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात आज आशिया कपची फायनल रंगणार आहे. सध्याचा भारतीय संघाचा खेळ पाहता बांगलादेशच्या तुलनेत भारताचे पारडे जड वाटतेय. मात्र बांगलादेशला कमी लेखून चालणार नाही. पाकिस्तानसारख्या संघाला नमवत बांगलादेशने अंतिम फेरीत स्थान मिळवलेय.
गेल्या १० पैकी ९ सामने भारतीय संघाने जिंकलेत त्यामुळे सहाव्यांदा आशिया कपवर नाव कोरण्यास भारतीय संघ सज्ज झालाय. मात्र आशिया कप जिंकल्यास धोनी आणि कंपनीसाठी पुढील स्पर्धेसाठी ही बॅड न्यूज ठरण्याची शक्यता आहे.
यामागे अस्ट्रोलॉजीकल कारण आहे. जेव्हा जेव्हा धोनी ब्रिगेड लहान लहान स्पर्धा जिंकते तेव्हा त्यानंतरच्या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अपयश येत असल्याचे दिसून आलेय.
कर्णधार म्हणून धोनीने २०१० आणि ११ मध्ये इंडियन प्रीमियर लीग जिंकली. त्यानंतर २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी त्यानंतर २०१४मध्ये चॅम्पियन लीगमध्ये यश मिळवलं. मात्र २०१४मध्ये त्याला टी-२० वर्ल्डकप जिंकता आला नाही तसेच २०१५मध्येही आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत भारताला सेमीफायनलमध्ये पराभवास सामोरे जावे लागले.
त्यामुळे टी-२० वर्ल्डकपआधी होत असलेली आशिया कपची फायनल भारताच्या पथ्यावर पडणार का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.