धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल

PTI | Updated: Jul 15, 2014, 04:37 PM IST
धोनीची कॅप्टनसी काढून घ्यायला हवी- चॅपेल title=

'टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीचा उमेदीचा काळ संपलाय. तो आता टेस्ट क्रिकेटचं नेतृत्व करण्याच्या कामाचा नाही. त्यामुळं भारताच्या कसोटी संघाची सूत्रं त्याच्याकडून काढून ती विराट कोहलीकडं द्यायला हवीत. ती वेळ आली आहे,' असं सडेतोड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन इयान चॅपेल यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं भारतीय क्रिकेटमध्ये नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

चॅपेल यांच्या मतानुसार, 'वन डे आणि टी-20 मॅचेससाठी धोनी ठीक आहे. पण टेस्टचा कॅप्टन म्हणून त्याची उपयुक्तता संपलीय. संघाला प्रोत्साहन देण्यात तो कमी पडतोय. त्यामुळं आता कोहलीला ही जबाबदारी देणं योग्य होईल.'

चॅपेल पुढं म्हणाले, कोहलीच्या बॅटिंगवर कॅप्टनसीचा कोणताही परिणाम होणार नाही. त्याच्याकडे प्रचंड आत्मविश्वास आहे. कॅप्टन म्हणून तो भारतीय टीमसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. कोहलीचं वयही त्याच्या बाजूनं आहे, हे ध्यानात घ्यायला हवं. ३२ आणि ३३व्या वर्षी कर्णधारपद देण्यात कोणताही शहाणपणा नाही.'

'मागच्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडियाचा दणदणीत पराभव झाला होता, तेव्हाच धोनीला काढायला हवं होतं. त्याजागी ऑस्ट्रेलिया असती तर कर्णधारपदाची हकालपट्टीच झाली असती. पण भारतीय निवड समितीकडून कठोर निर्णयाची अपेक्षाच करता येत नाही. बीसीसीआय नेहमी खेळाडू निवृत्त होण्याची वाट बघते,' असं निरीक्षण चॅपेल यांनी नोंदवलं आहे.

गेली अनेक वर्षे धोनीनं टीम इंडियाचं यशस्वी नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतानं दोन  वर्ल्डकप जिंकण्याची किमया साधली आहे. मात्र, गेल्या काही काळात टीम इंडियाला नव्या दमाचे आणि प्रतिभावंत खेळाडू मिळाले आहेत. विशेषत: सचिनच्या निवृत्तीनंतर विराट कोहली यानं सातत्यपूर्ण कामगिरी करून भारताला अनेकदा विजयाप्रत नेलं आहे. त्यामुळं कोहलीवर टीमची जबाबदारी टाकण्याबद्दल सूर उमटत आहे. चॅपेल यांनी जाहीर विधान करून त्याला बळ दिलं आहे. याचे परिणाम काय होतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.