ग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन?

ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले. 

Updated: May 3, 2015, 10:37 PM IST
ग्रेग चॅपेल... हिरो की व्हिलन? title=

मुंबई : मुंबई : टीम इंडियाच्या नव्या कोचचा शोध सुरु झाला आहे... आता नवा कोच कोण असेल याचीच उत्सुकता क्रिकेट जगताला लागून राहिलीय.याच अनुषंगाने काही महत्त्वाच्या कोचेसचा आढावा घेणारी विशेष लेखमालिका 'कुणी घडवलं, कुणी बिघडवलं?'... 

ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटपटू आणि कॅप्टन ग्रेग चॅपल हे कांगारुंसाठी जरी हिरो ठरले असले तरी भारतीय क्रिकेटविश्वात त्यांनी खलनायकाची भूमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियन क्रिकेट जगतात आपल्या कामगिरीची छाप सोडणारे ग्रेग चॅपल हे भारतीय क्रिकेटसाठी मात्र घातक ठरले. 

ग्रेग चॅपेल...मोस्ट कॉन्ट्रावर्शियल इंडियन कोच...खरंतर चॅपल हे ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू आणि कॅप्टनही होते. मात्र भारतीयांसाठी ते व्हिलन आहेत. कारण त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये यादवी निर्माण झाली. टीम इंडियाचे ते सर्वाधिक वादग्रस्त कोच ठरलेत. 

जॉन राईट यांच्यानंतर ग्रेग चॅपले यांच्याकडे टीम इंडियाच्या कोचिंगपदाची सूत्र सोपवण्यात आली. डेव वॉटमोर, मोहिंदर अमरनाथ, ग्रॅहम फोर्ड, टॉम मूडी आणि जॉन एंबुरी यांना मागे टाकत ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियासारख्या व्हीआयपी टीमच्या कोचिंगपद मिळवलं होत. विशेष म्हणजे तेव्हाचा टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीच्या शिफारशीनुसारच चॅपल यांना भारतीय क्रिकेट टीमचं कोचिंगपद बहाल करण्यात आलं होत. मात्र चॅपल यांच्यासारख्या हुकमशाही व्यक्तिमत्वाशी गांगुलीचेच सर्वाधिक खटके उडाले. 

चॅपल हे 2005 ते 2007मध्ये टीम इंडियाच्या कोच पदावर होते. मात्र आपल्या कामापेक्षा वाद, विधान आणि वागणुकीमुळेच ते अधिक चर्चेत राहिले. सौरव गांगुलीबरोबरचा त्यांचा वाद सर्वाधिक गाजला. त्यावेळी चॅपल विरुद्ध गांगुली हा नाट्यमय सामना चांगलाच रंगतदार ठरला. 

झिम्बाब्वे दौ-यानंतर ग्रेग चॅपल यांनी गांगुली हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या टीम इंडियाची कॅप्टन्सी करण्यासाठी अनफिट असल्याचा मेल बीसीसीआयला केला. तो मेल मीडियामध्ये लिक झाला आणि मग चॅपल-गांगुली नाट्य भारतीय क्रिकेटरसिकांना पहायला मिळालं. गांगुलीला टीममधून वगळण्यातही चॅपल यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यावेळी क्रिकेटविश्वात चांगलीच खळबळ माजली होती.

एवढच नव्हे तर इतर अनेक दिग्गज प्लेअर्सना चॅपल यांची ट्रेनिंगची पद्धत आणि त्यांची वागणूकही विचित्र वाटत असे. सचिन, द्रविड, लक्ष्मण, झहीर, हरभजन यांनी चॅपल हे कसे वागत असत याबाबत उघड किस्से सांगितले आहेत. झहीरला आपण कोच असेपर्यंत टीम इंडियाकडून न खेळण्याबाबत त्यांनी सांगितलं होत. तर 'तुझं वय घरी बसण्याचं आहे' असं त्यांनी लक्ष्मणला सुनावलं होत. 

एकंदरीतच विक्षिप्त आणि हेकेखोरपणा असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे टीम इंडियाला शिस्त लागण्यापेक्षा टीमचं नुकसानच अधिक झालं. सचिन तेंडुलकरने तर आपल्या 'प्लेईंट ईट माय वे' या आत्मचरित्रात चॅपल हे रिंगमास्टर असल्याचं लिहिलय. प्लेअर्सचा नीट अभ्यास न करता त्याच्यावर ते आपल्या कल्पना लादत असल्याचा आरोप सचिनने आपल्या पुस्तकामध्ये केलाय. यावरुनच चॅपल हे कसं व्यक्तिमत्व असावं याची प्रचिति येते. 

त्यांच्याच काळात टीम इंडियामध्ये यादवी निर्माण झाली. प्लेअर्समध्ये फूट पाडण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं काही प्लेअर्स सांगतात. त्यांची वागणूकही एखाद्या कोचला शोभावी अशी नसे. गांगुलीला टीममधून वगळण्यात आल्यानंतर कोलकात्यामध्ये त्याचे चाहते चॅपल यांच्याविरोधात घोषणा देत असताना त्यांनी अश्लिल हावभाव केले होते. त्यांच्या गैरवर्तवणूकीमुळे क्रिकेटविश्व आणि फॅन्समध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. त्यांच्याच काळात 2007 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर फेकली गेली होती. बांग्लादेशसारख्या टीमकडून टीम इंडियाला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय क्रिकेटजगतात आणि क्रिकेट फॅन्समध्ये चॅपलविरोधात एकच लाट निर्माण झाली आणि मग बीसीसीआयनेही ग्रेग चॅपल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर ग्रेग चॅपल यांनी टीम इंडियाच्या कोचपदाचा राजीनामा द्यायला लागला आणि टीम इंडियात माजलेली यादवी आणि वादही शमले.
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.