श्रेयस देशपांडे, झी डिजीटल, मुंबई: संजय बांगर याची टीम इंडियाच्या झिम्बाब्वे दौऱ्याचा कोच म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑल राऊंडर म्हणून खेळलेल्या संजय बांगर याचा टीम इंडियाचा खेळाडू ते कोच होण्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
संजय बापूसाहेब बांगर याचा जन्म ११ ऑक्टोबर १९७२ ला बीडपासून २५-३० किमी अंतरावर असलेल्या गावामध्ये झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या संजय बांगरचं सुरवातीचं शिक्षण औरंगाबादमध्ये झालं, पण क्रिकेटसाठी त्यानं लहान वयातच मुंबई गाठली.
मी क्रिकेटची पहिली मॅच बघितली ती १९८३ ची वर्ल्ड कप फायनल. या मॅचनंतरच मला क्रिकेटचं वेड लागलं अशी प्रतिक्रिया संजय बांगरनं दिली आहे. त्या दिवशी भारतानं क्रिकेटच्या इतिहासामध्ये रचलेला तो इतिहास शेजाऱ्यांच्या टीव्हीवर पाहिला. कपील देव आणि सुनिल गावसकरांसारखे क्रिकेटपटू बघून मला क्रिकेट खेळायची प्रेरणा मिळाली असं बांगर म्हणाला आहे.
महाराष्ट्राच्या अंडर १५ टीममध्येही त्याची निवड झाली आणि तो एक मॅचही खेळला. क्रिकेटपटू होण्यासाठी बीड आणि औरंगाबादमध्ये सुविधा मिळणं कठीण असल्यानं बांगर मुंबईत आला.
पंधराव्या वर्षी मुंबईत आल्यावर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीसारख्या खेळाडूंच्या खेळाची बरोबरी करणं बांगरला कठीण जात होतं, त्यामुळे मुंबईत आल्यावरही दोन वर्षांपर्यंत मॅच खेळता आली नाही. क्लब क्रिकेटमध्ये मात्र त्यानं खोऱ्यानं रन केल्या होत्या.
मुंबईतल्या क्रिकेटमधल्या स्पर्धेमुळे बांगरनं रेल्वेकडून खेळण्याचा निर्णय घेतला. १९९३मध्ये बांगरनं विदर्भाविरुद्धच्या मॅचमध्ये क्रिकेटमध्ये आगमन केलं.
२००१-०२ मध्ये बांगरनं इंग्लंड विरुद्धच्या मोहाली टेस्टमध्ये टीम इंडियात आगमन केलं. आपल्या दुसऱ्याच टेस्टमध्ये बांगरनं सेंच्युरी मारली.
बांगरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली हेंडिंग्ली टेस्टमधली कामगिरी कायमच लक्षात राहिल. या मॅचमध्ये ओपनिंगला आलेल्या बांगरनं ६८ रन तर केल्याच पण राहुल द्रविडबरोबर दुसऱ्या विकेटसाठी १७० रनची पार्टनरशीप केली.
ही टेस्ट भारतानं इनिंग आणि ४६ रननं जिंकली. इंग्लंडला इंग्लंडच्याच मैदानात हरवण्याचा पराक्रम करण्यामध्ये बांगरनं महत्त्वाचं योगदान बजावलं.
वनडे क्रिकेटमध्ये मात्र बांगरला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. १५ मॅचमध्ये बांगरनं १८० रन केल्या आणि सात विकेट घेतल्या.
२००३ मध्ये वेस्ट इंडिजचा संघ जेव्हा भारतात आला, तेव्हा बांगरनं दोन हाफ सेंच्युरी मारल्या. पण न्यूझिलंड दौऱ्यावेळच्या दोन खराब कामगिरीनंतर बांगरला टीममधून काढण्यात आलं.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मात्र बांगरनं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. बांगरनं १६५ मॅचमध्ये ८,३४९ रन केल्या तर ३०० विकेटही घेतल्या. बांगर खेळत असताना रेल्वेनं दोन रणजी ट्रॉफी, दोन इराणी ट्रॉफी आणि एक वनडे चॅम्पियनशीप अशा पाच ट्रॉफी जिंकल्या.
यानंतर संजय बांगरची आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हनं पंजाबचा कोच म्हणून नियुक्ती झाली. कोचिंगच्या पहिल्याच सिझनमध्ये बांगरला यश मिळालं. २०१४ च्या सिझनमध्ये पंजाबनं थेट फायनलमध्ये धडक मारली. त्यानंतर बांगरनं रवी शास्त्रीबरोबर टीम इंडियाच्या कोचची भूमिका बजावली. आता तर बांगरची मुख्य कोच म्हणून नियुक्ती झाली आहे.
शेतकरी कुटुंबातूनच आलेला असल्यामुळे बांगर अजूनही शेती करतो. त्याचं आत्ताही औरंगाबादमध्ये शेत आहे.