चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

Updated: Oct 2, 2014, 06:15 PM IST
चक दे इंडिया! पाकला नमवत भारताचं हॉकीमध्ये गोल्ड मेडल title=

इंचिऑन: पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ नं नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये गोल्ड मेडल पटकावलंय.  आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावलं असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणाऱ्या ऑलिंपिकचं तिकीटही कन्फर्म झालंय. 

आशियाई स्पर्धेत गुरुवारी हॉकीमध्ये भारतीय संघांची पाकिस्तानसोबत अंतिम लढत होती. आशियाई स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळं अंतिम सामन्यात भारत या पराभवाचा वचपा काढणार की पुन्हा पाकिस्तान विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. 

सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्ताननं पहिला गोल करुन भारतीय संघावर दबाव आणला. मात्र सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघानं हा दबाव झुगारुन पाकला चोख प्रत्युत्तर दिलं. पहिल्याच हाफमध्ये भारतानंही गोल केला आणि सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघानं गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र यात त्यांना अपयश आलं. सामना १ -१ नं बरोबरीत संपल्यावर पेनल्टी शूट आऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. 

पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताचा गोलकिपर श्रीजेशची भक्कम तटबंदी मोडून काढण्यात पाकिस्तानच्या हॉकीपटूंना अपयश आलं आणि भारतानं पेनल्टी शूट आऊटमध्ये ४-२ असा विजय मिळवत गोल्ड मेडल पटकावले. भारतानं तब्बल ३२ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकला नमवलं आहे. यापूर्वी १९८२ मध्ये आशियाई स्पर्धेतील फायनलमध्ये पाकने भारताचा ७-१ असा दारुण पराभव केला होता. 

दरम्यान, रिलेमध्ये भारताच्या महिला संघाला सुवर्णपदक मिळालंय. ४ बाय ४०० मीटरच्या रिलेमध्ये भारताच्या महिला संघानं सुवर्ण पदक पटकावलं. गुरुवारी दोन सुवर्णपदक मिळाल्यानं पदक तालिकेत भारत ११ व्या स्थानावरुन ९ व्या स्थानावर आला आहे. भारताच्या खात्यामध्ये ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३५ कांस्य पदक आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.