इंचियोन : आशियाई खेळांत ६० किलोग्रॅम गटात भारतीय बॉक्सर सरिता देवी आज पंचांच्या चुकीच्या निर्णयाची बळी ठरलीय.
विजेत्यांना पदक प्रदान करत असताना जेव्हा सरिता देवी हिला कांस्य पदक देण्यात येत होतं... तेव्हा तिनं तो साफ नाकारला आणि रडू अनावर झालं. ढसाढसा रडताना यावेळी या निर्णयाविरुद्ध इतर कोणत्याही खेळाडूंनी याबद्दल चक्कार शब्दही काढला नाही, याबद्दलचा तिचा रागही दिसून येत होता. कोरियन खेळाडूच्या गळ्यात आपलं पदक घालून सरिता देवी इथून निघून गेली. पंचांच्या चुकीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी सरितानं पत्रकार आणि सहकारी खेळाडूंकडून पैसे जमा करून ५०० डॉलर जमा केले. पण, ही अपील आयोजकांनी अमान्य केली होती.
आशियाई स्पर्धेच्या सेमीफायनल मॅचच्या निर्णयावर हा वाद निर्माण झालाय. या मॅचमध्ये दक्षिण कोरियाच्या जिना पार्क हिला विजयी घोषित करण्यात आलं. पण, मॅचमध्ये भारताच्या सरिता देवी हिचं पारडं जड असल्याचं चित्र दिसत होतं.
भारतानं याविषयी आपला विरोध नोंदविला होता. पण, भारताची ही मागणी फेटाळण्यात आली. आपल्यावर अन्याय झाल्यानं सरिता निराश झालीय.
जिना हिच्याविरुद्ध चांगल्या स्थितीत असतानाही जजनं सरिताला ०-३ अशा फरकानं पराभूत घोषित केलं.
सरितानं ‘दे दणादण’ देत आपल्या प्रतिस्पर्धीला रडकुंडीला आणलं होतं पण, आश्चर्य म्हणजे अल्जीरियाई रेफ्री हम्मादी याकूब खेरा यांनी भारतीय बॉक्सरला एकही ‘स्टँडींग काऊंट’ दिला नव्हता.
शेतकरी कुटुंबातून आलेली आणि मणिपूरच्या मयांग इंफाळची रहिवासी असलेल्या सरितानं २०१४ च्या ग्लासगो कॉमनवेल्थमध्ये सिल्व्हर मेडल पटकावलं होतं. तर एशियन महिला बॉक्सिंग चॅम्पियनशीपमध्ये चार गोल्ड आणि एक सिल्व्हर मेडल तिच्या नावावर आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.