www.24taas.com,पुणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात येताना अडवू नका. त्यांना पुण्यात येवू दे. शांततेने आणि संयमाने सामोरे जा, असा आदेश राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांनी दिलेत.
राष्ट्रवादीचे पुण्यातील नेते अंकुश काकडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पुण्यात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला होता. मात्र, राज यांनी जशास तसे उत्तर देताना आम्हाला कोणाची परवानगी नको. मी ७ तारखेला पुण्यात येतोय. कोण मला आडवतो, ते पाहतो. अडवून दाखवाच, असे प्रती अव्हान राज यांनी दिले होते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि मनसे यांच्यातील वाद शिगेला पोहचण्याची शक्यता होती.
राष्ट्रवादी पक्ष हा लोकशाही आणि भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवणारा आहे. प्रत्येक नागरिकाला भारतात कुठेही जाण्याचा आणि विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जनता दुष्काळात होरपळत असताना त्यावर राजकीय पोळी भाजण्याची आमची प्रवृत्ती नाही. अशा परिस्थिती राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे काम काही पक्ष जाणीवपूर्वक करीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हा टोला मनसे आणि शिवसेनेला नाव न घेता राष्ट्रवादीने लगावलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संयम दाखवून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यात आपली शक्ती खर्ची करण्याचे प्रयत्न करतील, असे राष्ट्रवादीकडून स्पष्च करण्यात आलेय.