आनंद दिघेंच्या भेटीसाठी राज ठाकरे गेले होते जेलमध्ये

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका खास कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नेते मधुकर सरपोतदार यांच्या आठवणींना उजाळा देताना एक खास किस्सा सांगितला.

Updated: Jan 30, 2013, 10:32 PM IST

www.24taas.com, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एका खास कार्यक्रमात शिवसेनेचे माजी नेते मधुकर सरपोतदार यांच्या आठवणींना उजाळा देताना एक खास किस्सा सांगितला. जेव्हा मधुकर सरपोतदार आणि आनंद दिघे यांना नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेस, राज ठाकरे हे आनंद दिघेंची भेट घेण्यासाठी नाशिकच्या जेलमध्ये गेले होते. त्यावेळेसचा चीजचा खास किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला.
‘मधुकर सरपोतदार म्हणजेच दादांना ‘चीज’ फार आवडत असे. त्यामुळे चीज आणि अनेक खाण्याच्या वस्तू घेऊन मी स्वत: जेलमध्ये दादांना आणि आनंद दिघेंना भेटण्यासाठी गेलो होते.’ ‘दादांना आणि आनंद दिघेंना भेटलो. त्यानंतर तेथील जेलर साहेबांना भेटलो आणि ते सगळं खाण्याचं साहित्य त्यांच्याकडे दिलं, म्हटलं दादांना आणि आनंद दिघेंना ह्या वस्तू द्या.’ ‘जेव्हा दादा जेलमधून सुटून बाहेर आले, त्यानंतर मी दादांना पुन्हा विचारलं की, दादा चीज खाल्लं की नाही? तेव्हा आमच्या पर्यंत चीज पोहचलंच नाही.’ ‘त्या चीजचं काहीच चीज झालं नाही. ते पोहचण्याच्या आधीच मधल्या मध्ये संपून गेलं.’ असं म्हणत राज ठाकरे यांनी आनंद दिघे आणि मधुकर सरपोतदार यांच्याविषयी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र त्यावेळेस राज ठाकरे स्वत: आनंद दिघेंच्या भेटीला गेल्याचे त्यांनी आर्वजुन सांगितले.
आज मधुकर सरपोतदार यांच्या स्मरणार्थ काढण्यात आलेल्या प्रतिष्ठानाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्यावेळी राज ठाकरे यांनी मधुकर सरपोतदार आणि आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मधुकर सरपोतदार यांना दादा म्हणून राज ठाकरे संबोधित असे. ‘दादा हे अतिशय हे प्रेमळ पण कडक शिस्तीचे असे होते. मात्र त्यांना एकूणच विनोदाचे वावडे होते. असं म्हणत राज ठाकरे यांनी त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या. राज ठाकरे यांनी मधुकर सरपोतदारांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
राज ठाकरे यांनी आज एका कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावली होती. तेथे राज ठाकरे काय बोलणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. दिवसभर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र त्याविषयी आज काहीही बोलणार नसल्याचे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मात्र योग्य वेळ आल्यास नक्की बोलणार असं सांगून राज ठाकरे यांनी या सगळ्या चर्चेबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. आजचा दिवस दादांचा(मधुकर सरपोतदार), दादूचा (उद्धव ठाकरे) नाही. असं म्हणत अनेक दिवसानंतर उद्धव ठाकरे यांचा दादू म्हणून उल्लेख केला त्यामुळे ही जवळीक वाढते आहे की, मिष्किलपणे उद्धव ठाकरेंना त्यांनी टोमणा मारला. याबाबत चर्चा मात्र चांगलीच रंगली.