हतबलता नव्हे, मराठीसाठी राजकडे हात - जोशी

मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय. राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 18, 2013, 11:01 AM IST

www.24taas.com,मुंबई

मराठी लोकांच्या हितासाठी उद्धव ठाकरेंनी मनसेकडे हात पुढे केला होता. कुठल्या हतबलतेमुळे नव्हे, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी दिलीय.
राज ठाकरेंच्या नकारामुळेच आपण नाराज झाल्याचं मनोहर जोशींनी म्हटलंय. आता यापुढे आपण शिवसेना-मनसे एकत्रीकरणाचे प्रयत्न करणार नसल्याची प्रतिक्रिया मनोहर जोशी यांनी दिलीय.
शिवसेनेसोबत जाणार नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं असलं, तरीही भाजप-शिवसेनेचे नेते मात्र आशावादी आहेत. राज ठाकरे महायुतीत येण्याबाबत आपण आशावादी असल्याचं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनंही आपला पर्याय खुला ठेवला आहे. उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका पूर्वीच स्पष्ट केलीये. हा पर्याय स्वीकारायचा की नाही, हे राज ठाकरेंवर अवलंबून आहे, असं शिवसेना नेते विनायक राऊत म्हणाले.

राज ठाकरे शिवसेनेला टाळी देणार की टाळणार या प्रश्नाला राज ठाकरेंनी कोल्हापूरच्या सभेत उत्तर दिल होतं. आपण स्वबळावर लढणार असून मला कुठल्याही युतीची गरज नाही. एकत्र येण्याची भाषा अशी वर्तमानपत्रात छापून केली जाते का? असा सवाल करत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या टाळीला टोला लगावला होता.