www.24taas.com, झी मीडिया, पुणे
रविवारी पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची एसपी कॉलेजच्या मैदानात जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी पुढच्या १२ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रास्तारोको करण्याचं आवाहन जनतेला केलंय. एव्हढंच नव्हे तर या रास्तारोकोचं नेतृत्वही आपण करणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर करून टाकलंय. यावेळी एसपी मैदानावर कार्यकर्त्यांची खचाखच गर्दी पाहायला मिळाली.
प्रचाराचं नारळ फोडण्यासाठी ही सभा नाही...
निवडणुकीचे दिवस जवळ येतात तसतसे राजकीय पक्षांच्या स्टार नेत्यांकडून सभांचा धडका लागलाय. राज ठाकरेंची ही सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग असं म्हटलं जातं होतं. यावर राज ठाकरेंनी 'ही सभा म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं नारळ फोडण्याची सभा नाही... इथं प्रचाराचा नारळ फोडायला आलो नाही तर त्याचं नारळानं सरकारचं टाळकं फोडायला आलोय' असं म्हणत भाषणाला सुरुवात केली.
सभेसाठी सरकारनं मदत केली नाही
'मी इथं सरकारची मारायला आलोय आणि म्हणे मला सरकारनं सभेसाठी जागा मिळवण्यासाठी मदत केली...' असं म्हणत राज ठाकरेंनी मनसेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागा मिळवण्यासाठी पुढाकार घेतल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. यावेळी 'मला विकत घेणार पैदा व्हायचाय' असंही त्यांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री बिनपगडीचे मनमोहन सिंग आहेत
टोलच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंनी आपण 'चार वेळा मुख्यमंत्र्यांना भेटलो. पण, आघाडीचं सरकार असल्यानं निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं... अरे, हात बांधलेत तर तिथं बसलातच कशाला?' असं म्हणत मुख्यमंत्री म्हणजे 'बिनपगडीचे मनमोहन सिंग' अशी टीका राज ठाकरेंनी केली.
उद्यापासून चुन-चुन के मारुंगा
यावेळी, राज ठाकरेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ आणि सुप्रीया सुळे यांच्यावरही तोंडसुख घेतलं. 'सर्व मार्ग वापरले, उपयोग नाही... आता, सुप्रिया सुळेंनीच सांगितलंय एसटी नाही मंत्र्यांच्या गाड्या फोडा... बरं, उद्यापासून चुन-चुन के मारुंगा' असं म्हणत राज ठाकरेंनी उपस्थितांच्या चांगल्याच टाळ्याही मिळवल्या.
टोलचा पैसा जातो मंत्र्यांच्या घरात
यावेळी, जनतेचं जनरल नॉलेज वाढवत राज ठाकरेंनी टोलचा हिशोब लोकांसमोर मांडला. 'टोलचा सगळा व्यवहार कॅशमध्ये होतो. केवळ रस्त्यांसाठी आपण १३ कर भरतो... केवळ मोटारवाहन करातून २२,२६६ कोटींची कमाई होते... आमचा टोलला विरोध नाही, पण पैशांचं काय होतं? हा पैसा जातो कुठे तर, मंत्र्यांच्या घरात... टोलच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक होतं... महाराष्ट्रात हाय वे वर साधी बाथरुमचीही सोय नाही आणि मुख्यमंत्री म्हणतात माझ्याकडे उत्तर नाही' असं म्हणत राज यांनी सरकारच्या धोरणावर चांगलीच टीका केली.
टोलफोडीचे पैसे भरणार नाही...
मनसेनं राज्यभरात ठिकठिकाणी केलेल्या टोलफोडीबद्दल आपल्याला अनेक नोटिसा मिळल्यात... घंटा पैसे भरतो मी... अगोदर लोकांना पैसे परत करा मग राज ठाकरे टोल भरायला तयार आहे असं म्हणत आपण टोलफोडीचे पैसे भरणार नाहीच पण, टोलनाके सतत फोडतच, सतत जाळतच राहू असंही त्यांनी म्हटलंय.
शिवसेनेवर टीका...
'माझ्यावर टीका कोण करतंय तर, शिवसेना... मला समजतंच नाही... मी लढतोय सरकारच्या विरोधात... हे टीका माझ्यावर करतात... अरे तुम्ही सरकारमध्ये आहात की विरोधकांच्या भूमिकेत...' असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं.
'रास्तारोको'साठी तयारीला लागा
यावेळी, राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची पुढची वाटचालही उघड केलीय. टोलविरोधात येत्या १२ तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात रास्तारोको करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. या रास्तारोकोचं नेतृत्व खुद्द आपणच मैदानात उतरणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय. 'असेल हिंमत तर अडवून दाखवा' असं सरकारला आव्हान देत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना १२ तारखेच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय.
व्हिडिओ : 'राज ठाकरेला विकत घेणार पैदा व्हायचाय'
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
*