www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘मराठी तरुणांची डोकी भडकवायची आणि त्यांना मारहाण-तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहीत करायचं आणि खटला दाखल झाल्यावर आपण त्यातून नामानिराळं व्हायचं... म्हणजेच मराठी तरुण यांच्या शिक्षेची फळं भोगतायत त्यांच्यावर अजूनदेखील खटले सुरू आहेत’ असं म्हणत काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवलीय.
ऑक्टोबर, २००८ साली वांद्रे इथल्या चेतना महाविद्यालयात झालेल्या रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतिय उमेदवारांना झालेल्या मारहाण प्रकरणी राज ठाकरे गुरुवारी वांद्रे कोर्टात हजर राहिले होते. याप्रकरणी आपल्याला दोषमुक्त करण्यात यावं, यासाठी राज ठाकरेंनी अर्ज केलाय. घटना घडली त्यावेळी राज ठाकरे घटनास्थळी नव्हतेच, असा युक्तीवाद त्यांच्या यांच्या वकिलांनी केलाय. यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं राज ठाकरेंना चांगलंच धारेवर धरलंय.
माणिकराव ठाकरेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही राज ठाकरेंवर टीका केलीय. ‘कायद्याचा बडगा पडल्यानंतर राज ठाकरेंनी घाबरून आपण तिथं नव्हतोच असा पवित्रा घेतलाय. आपली जबाबदारी झटकून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. तरुण पिढीला विविध खटल्यांमध्ये अडकवणं हेच काम त्यांनी केलंय’ अशी टीका मलिक यांनी केलीय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.