पुणे : गायब झालेल्या पावसाच्या नावानं जो, तो खडे फोडतोय. पण गेल्या वर्षी हा पाऊस दणकून बरसला होता. त्यावेळी धरणं तुडुंब भरली होती. पण ते पाणी नीट साठवलंच गेलं नाही.... त्याचीच शिक्षा आता पुणेकरांना पाणीकपातीच्या रुपानं भोगावी लागतेय.
पुण्याच्या पाणीपुरवठा योजनेला सुमारे १४६ वर्षांचा इतिहास आहे. १८६७ मध्ये इंग्रजांनी खडकवासला बांधलं आणि विस्तारित शहरासाठीची पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आली.
पुढे १९६१ मध्ये पानशेत, १९९४ मध्ये वरसगाव आणि २००० साली टेमघर बांधून पूर्ण झालं. आजघडीला या चार धरणांमधल्या सुमारे २९ टीएमसी पाण्यावर पुणेकर आणि त्यांच्या शेतीची तहान भागवली जाते.
या २९ टीएमसीपैकी सुमारे १६-१७ टीएमसी पुण्याला तर ९-१० टीएमसी जिल्ह्यातल्या शेती आणि वापरासाठी दिलं जातं.
पाण्याच्या बाबतीत पुणेकरांची चंगळ म्हणावी अशीच साधारणपणे ही परिस्थिती आहे, असं असताना पुणेकरांवर पाणीटंचाईचं संकट कसं ओढवतं, त्याचं उत्तर म्हणजे सगळ्याच पातळ्यांवर नियोजनाची बोंब.
१. ....तोपर्यंत झोपा काढत रहायचं....
पाऊस उशिरा होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं कधीच दिला होता.... तरीही अखेरच्या क्षणी धावाधाव करुन नियोजन करण्याची प्रशासनाची सवय तशीच आहे.
२. आधी पाणीचोर पकडा
धरणातून होणारा ७० टक्के पाणीपुरवठा बंद पाईपलाइनमधून तर ३० टक्के पाणीपुरवठा उघडया कॅनोलद्वारे केला जातो. दोन्ही मधून पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती आणि चोरी होते.
३. गळती कोण रोखणार ?
पुणे शहराला दर दिवशी सुमारे १२५० एमएलडी पाणी धरणातून मिळतं. त्यापैकी ३० ते ४० टक्के पाण्याची गळती होते.
४. आधीपासूनच एकवेळ पाणीपुरवठा
पुणे शहराला २ ऐवजी १ वेळ पाणी पुरवठा करणार असल्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मुळात धनकवडी, सिंहगड रोड, नगर रोड यांसह निम्म्याहून अधिक शहराला आधीपासूनच एक वेळ पाणी पुरवठा होतो, ही वस्तुस्थिती आहे.
५. शहराचा आकार बशीसारखा, हे काय कारण आहे ?
पुण्यामध्ये कुठे केवळ एक तास तर कुठे २४ तास पाणी उपलब्ध आहे. शहराचा आकार बशीसारखा असल्यानं सर्व भागांना समान पाणी पुरवठा करणं शक्य नसल्याचं सांगण्यात येतं.
६. पाणी साठवायचं कुठे ?
धरणातून दरदिवशी उपलब्ध होणारं पाणी एकाच वेळी साठवण्याची सोय महापालिकेकडे नाही. त्यामुळे येणारं पाणी पुढे सोडून दिलं जातं.
७. जुनाट वितरण व्यवस्था
पाण्याची वितरण व्यवस्था अतिशय जुनी झाली आहे. पाईपलाईनसह संपूर्ण यंत्रणा बदलण्याची गरज आहे.
८. पुनर्वापरसासाठी प्रयत्नच नाहीत
पाण्याच्या पुनर्वापराच्या दृष्टीनं कुठलेच प्रयत्न कुठल्याच स्तरावर केले जात नाहीत.
९. पाण्याचं ऑडिट नाही
पुणे शहराला उपलब्ध होणा-या पाण्याचं कुठल्याच प्रकारचं ऑडिट होत नाही. धरणातून मिळणारं पाणी आणि शहरवासीयांना दिलं जाणारं पाणी याचा काहीच मेळ किंवा मोजमाप नाही.
१०. पुणेकरांनो, एवढ्या पाण्याचं करता काय....
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतर शहरांच्या तुलनेत पुण्याचा दरडोई पाणी वापर जास्त आहे..... हा निर्धारित मानकापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. त्यामुळे पुणेकरांनो, आता तरी पाणी जपून वापरा..
या सगळ्यामध्ये नियोजनाच्या जोडीने सर्वात पहिली गरज आहे ती संपूर्ण यंत्रणा नव्याने उभारण्याची. पुणे महापालिकेकडे त्याबाबतचा आराखडा तयार करण्याचं काम सुरु आहे.
सुमारे १० हजार कोटींपेक्षा अधिक खर्च या योजनेवर अपेक्षित आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या खर्चाची तजवीज करण्याचं आव्हान महापालिकेसमोर आहे. त्यापेक्षाही मोठी अडचण आहे, ती लाल फितीच्या कारभाराची.
पाणी ही फक्त माणसाची मुलभूत गरजच नाही, तर ती राष्ट्रीय संपत्ती आहे. फक्त नियोजनाचा अभाव आणि पाण्याच्या महत्त्वाची जाण नाही, यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होतेय. हे असंच चालत राहिलं तर निसर्गच काय. पुढची पिढीही माफ करणार नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.