भिकाऱ्यांच्या `सिरीयल किलर`ला अटक

शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Aug 9, 2013, 07:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी
शिर्डीतल्या तिहेरी हत्येप्रकरणी आज पोलिसांनी एका संशयितास अटक केलीय. संतोष रामदास अलकोल असं त्याचं नाव आहे. तो नगसरसुलचा राहणारा आहे.
शिर्डीतल्या सहा भिकाऱ्यांचे खून आणि दोघांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करण्यात आलाय. हा आरोपी मनोरुग्ण असल्याची बाबही समोर आलीय. शिर्डीत आठ जूलैला रेल्वे स्थानकावर दोन भिकाऱ्यांची तर २९ जुलैला तीन भिकाऱ्यांची हत्या झाली होती. पहिल्या दोन हत्यांचं सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासण्यात आलं. त्यानुसार पोलिसांनी रेखाचित्र प्रसिध्द केलं होतं. रेल्वे स्टेशन परिसरातून रेखाचित्राशी साम्य असलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याची चौकशी केल्यानंतर आता त्याला संशयित म्हणून अटक करण्यात आलीय.

शिर्डीत एकाच महिन्यात सहा भिकाऱ्यांची हत्या झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती. शिर्डीतल्या या हत्या सत्रामुळे शिर्डी पोलीस चक्रावून गेले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.