www.24taas.com, पुणे
पुणे मेट्रोच्या प्रकल्पाच्या ट्रॅकवर शरद पवारांची एन्ट्री झालीय. या विषयावर सर्व पक्षांच्या गट नेत्यांची पवारांनी बैठक घेतली. मेट्रोच्या विषयात आता पवारांनी लक्ष घातल्याने, वर्षानुवर्षे रखडलेला पुणे मेट्रोचा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत...
भुयारी की जमिनीवरून? खर्चामध्ये पुण्याचा वाटा किती आणि पिंपरी-चिंचवडचा किती? एफएसआय किती असावा? अशा एक ना अनेक कारणांनी पुणे मेट्रो रखडली. हा वाद मिटवून मेट्रोचा प्रस्ताव मंजूर करायला महापालिकेला तब्बल पाच वर्ष लागली. आता हा प्रस्ताव दोन वर्षांपासून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पडून आहे. आता या विषयात शरद पवारांनी लक्ष घातलंय. या विषयावर महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष आणि महापालिकेतल्या सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक पवारांनी घेतली.
पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व पक्षांनी मतभेद विसरून एकत्र यावं. असं आवाहन पवारांनी त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर वैयक्तिक लक्ष देण्याचं आश्वासनही पवारांनी दिलं. पुण्याच्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला लक्ष घालावं लागतंय. याचा अर्थ स्थानिक कारभा-यांचं अपयश आहे. अशी टीकाही होतेय.
वनाझ ते रामवाडी असा मेट्रोचा एकाच मार्ग गेल्या सात वर्षांत फक्त मंजुरीच्या टप्प्यांपर्यंत पोहचू शकलाय. पिंपरी-चिंचवड ते पुणे या मार्गाला अजून मंजुरीही मिळू शकलेली नाही. आता खुद्द शरद पवारच रखडलेल्या मेट्रोला मार्गी लावण्यासाठी सरसावले आहेत...त्यामुळे लवकरच पुणे मेट्रो प्रत्यक्ष रुळावरून धावू लागेल, अशी आशा पुणेकरांना वाटू लागलीय.