गुरूची फाशी, राजकीय खेळी – राज ठाकरे

संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 11, 2013, 09:15 AM IST

www.24taas.com,सातारा
संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी अफझल गुरूला देण्यात आलेली फाशी ही केंद्र सरकारची राजकीय खेळी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
राज ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौ-याला रविवार साता-यातून सुरुवात झाली. हे सरकार भंपक, ढोंगी आणि कारस्थानी असून येत्या काळातील निवडणुका डोळ्यापुढे ठेवूनच अफझलला फासावर लटकवण्यात आलं, असा हल्ला राज ठाकरे यांनी चढवलाय.
सतत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणारं सरकार वर्षाअखेरीस कारगिलसारखं छोटं युद्धही घडवून आणू शकेल, अशी खोचक टीकाही राज यांनी केली. देशविघातक कारवाया करणा-या दहशतवाद्यांना दहा-अकरा वर्षांनी फाशी होते, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतरही सहा वर्षांनी अफझलला फाशी देण्यात आली. ही फाशी म्हणजे राजकीय खेळीच आहे, राज म्हणालेत.
कसाबला फाशी दिल्यानंतर पाकिस्तानात अशांतता निर्माण झाली होती. त्यानंतर आता, आपल्या दोन जवानांची पाकनं हत्या केल्यानंतर भारतात अशांतता आहे. हे तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी अफझलच्या फाशीचं राजकारण करण्यात आलंय, असे राज म्हणालेत.

दरम्यान, `उद्धवदादू`बाबत राज यांनी मौन बाळगले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिलजमाईच्या प्रस्तावावर राज यांच्या उत्तराकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. महायुतीची टाळी वाजणार का?, असा पत्रकारपरिषदेत राजना विचारला. मात्र, राज यांनी चलाखीनं टाळला. सध्या तरी मी गालावर टाळी वाजवत आहे, असं `ठाकरे स्टाइल` उत्तर त्यांनी दिलं आणि `जय महाराष्ट्र` म्हणत पत्रकार परिषद संपवली.