मनसे-काँग्रेस टशन, विरोधी नेतेपद कोणाला?

पोटनिवडणूक... त्यातही महापालिकेची म्हटल्यावर तशी दुर्लक्षितच... पुण्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. महापालिकेच्या एका जागेची पोट निवडणूक कमालीची चुरशीची बनलीय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 3, 2013, 06:36 PM IST

www.24taas.com, नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे
पोटनिवडणूक... त्यातही महापालिकेची म्हटल्यावर तशी दुर्लक्षितच... पुण्यात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळतेय. महापालिकेच्या एका जागेची पोट निवडणूक कमालीची चुरशीची बनलीय. ही निवडणूक एव्हढी चुरशीचे बनण्याचे कारण म्हणजे, या निवडणुकीच्या निकालावर महापालिकेतील विरोधी पक्षनेता ठरणार आहे... त्यामुळे या निवडणुकीला पुणे महापालिकेच्या राजकारणात कमालीचे महत्व आले आहे.
पुणे महापालिकेच्या ४० अ या प्रभागात पोट निवडणूक होतेय. पुणे रेल्वे स्टेशन, सोमवार आणि मंगळवार पेठ अशा पुण्याच्या मध्यवस्तीतील हा प्रभाग. जातीचे खोटं प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहिरट यांचं नगरसेवक पद रद्द झालं
त्यामुळे ही पोटनिवडणूक लागलीय. काँग्रेस आणि मनसेचे प्रत्येकी २८ म्हणजे, समसमान संख्या बळ आहे.
पोटनिवडणुकीत विजय मिळाला तर, मनसेचा एक नगरसेवक वाढेल आणि विरोधीपक्ष नेते पद देखील मनसेकडे येईल... जागा राखण्यासाठी मनसेने पक्षाबाहेरच्या इंदुमती फुलावरे यांना उमेदवारी दिली आहे. निवडणूक जाहीर झाल्यावर फुलावरे राष्ट्रवादी काँग्रेसमधून मनसेत आल्या आहेत.
काँग्रेससाठी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे... कारण दोन महिन्यापूर्वीच मनसेकडील विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसकडे आले आहे. ते टिकवायचे असेल तर, काँग्रेसला विजय आवश्यक आहे. विद्यमान विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे देखील याच प्रभागातील आहेत.
काँग्रेस आणि मनसे व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या नीलम लालबिगे आणि भाजपच्या संध्या बरके या देखील रिंगणात आहेत. मात्र खरी लढत होईल ती, काँग्रेस आणि मनसे मध्येच... ७ जुलैला या चारही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होईल... तर, ८ जुलै रोजी विजयी उमेदवार पुणेकरांना समजेल आणि त्याचबरोबर महापालिकेतील विरोधीपक्ष कोण असेल हेही या
पोटनिवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईल...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.