www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये आज LBTच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधला संघर्ष शिगेला पोहचला. राष्ट्रवादी काँग्रेसनं दुकानं उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाचा फुसका बार ठरला. त्याचवेळी व्यापा-यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. आणि राजकीय नेत्यांना एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मिळाली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या घरासमोर पोलिसांनी असा लाठीमार केला. कुठल्याही परिस्थितीत वीस मे ला दुकानं उघडणार, अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसनं केली होती. पण त्याचवेळी व्यापा-यांनी दुचाकीवर मोर्चा काढत योगेश बहल यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून पोलिसांनी व्यापा-यांवर जोरदार लाठीमार केला. शिवसेना खासदार गजानन बाबर यांनीच व्यापा-यांना फूस लावून आंदोलन करायला भाग पाडल्याचा आरोप योगेश बहल यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस दुकानं उघडण्यासाठी आंदोलन करणार होतं. पण फक्त व्यापा-यांना दुकानं उघडण्याची विनंती करु, असं सांगत आंदोलन गुंडाळलं. पण अचानक व्यापा-यांच्या आंदोलनामुळे लाठीमार झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेना खासदारांवर आरोप करण्याची संधी मिळाली.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.