www.24taas.com, झी मीडिया, पुणे
आज नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पुण्याला दाखल झाले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारांनी काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
‘काँग्रेस सरकारनं जनतेला थापा मारल्यात... आता जनतेनं सरकारकडे त्यांच्या कामकाजाचा हिशोब मागायलाच हवा... काँग्रेस सरकारलाही आपल्या कार्यकाळाचा हिशोब जनतेला द्यावाच लागेल’ असं मोदी यांनी म्हटलंय.
जेव्हा जेव्हा काँग्रेस किंवा काँग्रेसच्या समर्थनानं सरकार स्थापन झालं तेव्हा तेव्हा लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. ‘आजकाल एकमेकांवर आरोप करणं फॅशन झालंय. केंद्रात मनमोहन सिंह यांचं सरकार आहे आणि उत्तर मोदीला मागितलं जातंय’ असं यावेळी मोदींनी म्हटलंय.
२०१४ साली केंद्रात भाजपचंच सरकार बनेल आणि भाजप दरवर्षी आपल्या कार्यकाळाचा हिशोब आपल्या जनतेला जरूर देईल. भारतात लोकशाही आहे आणि दिल्लीमध्ये शासक नाही तर सेवक असायला हवेत... लोकशाहीत सगळ्यात मोठा परिक्षक म्हणजे जनता असते आणि काही महिन्यांपूर्वीच मी ही परीक्षा देऊन आलोय, असंही त्यांनी म्हटलंय.
‘१०० दिवसांत जी कामं करण्याची आश्वासनं दिली होती त्यांचं काय झालं? काँग्रेसनं १०० दिवसांत महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. काँग्रेसनं दिलेल्या भूलथापांचं उत्तर त्यांना मिळालाच हवं... काँग्रेसचा बचाव केवळ अशक्य आहे’ असंही यावेळी मोदींनी म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.