धरणं तुडुंब भरली, तरी पाणी कपात राहाणारच!

पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 06:09 PM IST

www.24taas.com, पुणे
पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणं भरली असली तरी पुण्यातली पाणीकपात सुरूच राहणार आहे. पुणेकरांनी पाणी काटकसरीनं वापरण्याचा सल्ला जिल्ह्याच्या कालवा समितीनं दिलाय. पुणेकरांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केलीय.
पुण्याला पाणीपुरवठा करणा-या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या धरणांमध्ये आजघडीला ९५ टक्के म्हणजे २७.४ टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी साडेअकरा टीएमसी पाणी पुण्याला देण्यात येतं. पुणे शहराची वाढीव गरज लक्षात घेता वर्षाला साडे चौदा टीएमसी पाण्याची मागणी जलसंपदा खात्याकडे करण्यात आली होती. मात्र धरणात पुरेसे पाणी असूनही ती मागणी अमान्य करण्यात आलीय. त्यामुळे सध्या सुरु असलेली १० टक्के पाणीकपात कायम राहणार आहे.
खडकवासला धरणातून रब्बी हंगामासाठी ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये २ आवर्तनं देण्यात येणार आहेत. त्याच प्रमाणे नवीन उस लागवडीला परवानगी देण्यात आलीय. पण पुणेकरांच्या हक्काचं पाणी साखर सम्राटांचे कारखाने जगवण्यासाठी पळवण्यात येत असल्याचा आरोप होतोय. उपलब्ध पाण्याच्या नियोजनाच्या अभावामुळे पुणेकरांना गेली ३ वर्षं पाण्याची टंचाई सहन करावी लागतेय. त्यात राजकीय हितामुळे पाण्याची असमान वाटणी होते. त्यातून शहरी आणि ग्रामीण असा वाद सुरू झालाय.. पाण्याच्या नियोजनाची पुढची बैठक फेब्रुवारीमध्ये होणार आहे. त्यामुळे सध्या तरी पुणेकरांना पाणी जपूनच वापरावं लागणार आहे.