www.24taas.com, झी मीडिया,कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाकडं भाडेतत्वावर असलेल्या बसच्या चालकांनी काम बंद आंदोलन सुरू केलंय. त्यामुळं प्रवाशांचे हाल होतायत.
कोल्हापूर महापालिकेच्या परिवहन विभागाकडं कोंडुस्कर आणि बुथेला कंपनीच्या 30 बस भाडेतत्वावर आहेत. या बसवरील बसचालकांनी कमी पगार मिळत असल्याचं सांगत अचानक काम बंद आंदोलन सुरु केलंय. त्यामुळं परिवहन विभागाच्या कामावर परिणाम होऊन आठशे फे-या रद्द झाल्यायत. पगार वाढीचा प्रश्न मिटेपर्यंत संप मागं घेणार नसल्याची भूमिका चालकांनी घेतलीय. विशेष म्हणजे महापालिकेकडे प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्थाही नाही.
दरम्यान याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतींना विचारलं असता त्यानी हा प्रश्न खाजगी तत्वावर दिलेल्या बस मालक आणि चालकांचा प्रश्न असल्याचं सांगितलंय. तसंच कराराप्रमाणं त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असं अश्वासन दिलंय. पण पर्यायी व्यवस्था काय करणार याबाबत मात्र त्यांनी स्पष्ट काहीही सांगितलेलं नाही.
वास्तविक महापालिका प्रशासनाकडं पर्यायी व्यवस्था उपलब्ध असायला हवी होती. पण प्रशासनाकडं इच्छाशक्तीच नसल्यामुळं सर्वसामान्य प्रवाशांना हाल सोसावे लागतायत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.