www.24taas.com, सातारा
अजित पवारांच्या आत्मक्लेशाविरोधात साता-यातील शिवसैना कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. दत्त चौकात शिवसैनिकांनी अजित पवारांविरोधात घोषणाबाजी केली. तर यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धी सुचेल, अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीये.
हिरवळीवर बसण्यापेक्षा समाधधीजवळ उन्हात बसा म्हणजे चटके काय असतात हे कळेत असा सल्ला शिवसैनिकांनी अजितदादांना दिला. तर भाजपनेही समाधीस्थळाच्या बाहेर आंदोलन केलं.. नौंटंकी बंद करा आणि आधी राजिनामा द्या अशी मागणी यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केली.
बेताल वक्तव्यानंतर प्रायश्चित्त घेण्यासाठी गांधीगिरी करणा-या अजित दादांवर विनोद तावडेंनीही चांगलच तोंडसुख घेतलं.. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या विरोधासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीत रडारड करुन सहानुभूती मिळवण्याच्या जितेंद्र आव्हाड यांनी केलेला प्रयत्न राज्यातली जनता आजही विसरलेली नाही.
आव्हाडांची ही राडारड ताजी असतानाच आज अजितदादांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. सामाजिक जीवनात जे काही घडलं त्यासाठी पश्चातप करणार असल्याचं अजितदादांनी सांगितलंय. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चार दिवसांच्या अंतरात केलेल्या या दोन कृतींवर राज्यातली जनता विश्वास ठेवणार का हाच खरा प्रश्न आहे.
यशवंतराव यांच्या पायाशी बसून अजित पवारांना सुबुद्धा सुचेल, अशी अपेक्षा गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्त केलीये. अजित पवार यांची वृत्ती आणि प्रवृत्ती उर्मट पणाची आहे. त्यांच्या वागण्या बोलण्यामुळे शरद पवारांना तीन वेळा माफी मागावी ल्यागल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार हे हुकुमशहा असल्यासारखे वागतात.
अजित पवारांची आजची कृती म्हणजे ५० टक्के नाटक आणि ५० टक्के आत्मक्लेश आहे, अशी प्रतिक्रीया आरपीआय नेते रामदास आठवले यांनी दिलीय. टगे लोक माफी मागत नाहीत असंही त्यांनी सांगितलं.
वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत आलेले उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कराडमध्ये गांधीगिरी सुरु केलीय. यावर शेतकरी संघटनेनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी हल्लाबोल चढविला. ही अजित पवार यांची नौटंकी आहे, अशी टीका शेट्टी यांनी केली.
अजित पवारांनी सावलीत बसून आंदोलन करू नये. त्यांना जर खरंच असे काहीतरी वाटत असेल तर त्यांनी ऊन्हात बसून दाखवावे. लोकांना काय चटके बसलेत ते समजून येतील. केवळ सहानभुती मिळविण्यासाठी प्रतत्न करू नये. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा त्यांची खिल्ली उडविणे चुकीचे आहे. ते जे वागले ते बरोबर नाही. त्यांचे आत्मक्लेश हे नौटंकीचे प्रकरण आहे, असे शेट्टी म्हणालेत.
सामाजिक जीवनात जे काही घडलं त्याचं प्रायश्चित घेण्यासाठी आपण येथे आलोय. जो काम करतो तो चुकतो. त्यामुळे आपल्या चुकीबद्दल प्रायश्चित घेण्याचे ठरविलेय. मला जे वाटले ते मी करण्यासाठी येथे आलोय. मला काही प्रसिद्धी मिळवायची नाही. नाहीतर मी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले असते. तसे मी केलेले नाही. आपल्या राजकीय जीवनात असं काहीतरी करावसं वाटलं म्हणून मी कराडमध्ये आलोय. मला वाटलं, म्हणून मी हे करीत आहे, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले.