जितेंद्र आव्हाडांची भाषा घसरली, फडणवीस, तावडेंना म्हटले ‘बैल’

राष्ट्रवादी आणि वादग्रस्त विधानं हे आता समिकरण बनलं आहे. या पूर्वी अजित पवारांनी धरणात पाणी नाही तर लघुशंका करू का असे वादग्रस्त विधान केले होते. आता नेहमी आपला आक्रमक बाणा दाखविण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 26, 2013, 08:45 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सातारा
राष्ट्रवादी आणि वादग्रस्त विधानं हे आता समिकरण बनलं आहे. या पूर्वी अजित पवारांनी धरणात पाणी नाही तर लघुशंका करू का असे वादग्रस्त विधान केले होते. आता नेहमी आपला आक्रमक बाणा दाखविण्यासाठी तयार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते विनोद तावडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. सिंचनासंबंधी दोन बैलांनी गाडी भरून पुरावे सादर केले, अशी भाषा जितेंद्र आव्हाड यांनी वापरली आहे.
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात आव्हाड बोलत होते. भाषणाच्या वेळी विरोधांचा समाचार घेताना आव्हाड यांची भाषा घसरली. जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांचा चक्क बैल म्हणून उल्लेख केल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फोडले आहे.
आता त्या दोन ‘बैल’गाडीतून काय घेऊन गेले, त्या बद्दल मला बोलायचे नाही. असे म्हणून त्यांनी पुन्हा जयंत पाटीलांना साक्षीदार ठेवले, आणि म्हणाले, काय जयंत पाटील ते दोन ‘बैल’गाडीतून काय घेऊन गेले त्याच्याबद्ल आम्हांला काहीच बोलायचे नाही, अशा प्रकारची भाषा जितेंद्र आव्हाड यांनी वापरली.
सिंचन घोटाळ्याप्रकरणी भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चितळे समितीकडे पुरावे सादर केले आहेत. या दोघांनी बैलगाडीतून सिंचनाबाबतचे पुरावे चितळे समितीला सादर केले.
पाच वर्ष झाली आणि निवडणुका येणार असे म्हटल्यावर महाराष्ट्रातील एक राजकारणी चिपळ्या घेऊन शरद नामाचा अजित नामाचा जप सुरू करतो. एका हाता शरद पवार एका हातात अजित पवार की समजायचं महाराष्ट्राची निवडणूक आली. गोपीनाथ मुंडे गेल्या दोन महिन्यापासून ओरताहेत की नाही शरद पवार, अजित पवार...... मग पुढच्या चार महिन्यात निवडणुका येणार.... अशीही टीका त्यांनी गोपीनाथ मुंडेवर केली.
एखाद्या हत्तीला ताब्यात घायचे असेल तर काय करावे लागते की त्या हत्तीच्या (गंड स्थळावर) डोक्यावर मारावे लागले. आमचे गंडस्थळ काय आहे? अजित पवार, आर. आर. पाटील, भुजबळ..... हल्ला झाला की आम्ही गडबडून जातो. तर गडबडून जायचं कारण नाही. हत्तीने न गडबडता धावत सुटायचं आणि या दोन ‘बैला’च्या गाडीतून आलेल्या सर्वांना भुईसपाट करायचे. विचारांची लढाई आम्ही विचारांनी लढू... पण पुरोगामी महाराष्ट्राला या जातीवादी लोकांच्या हातात सोपविणार नाही असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करायला आलो असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.