नाशिकमध्ये गुन्हेगारीचा उच्चांक

बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत.

Updated: Feb 21, 2012, 09:57 PM IST

योगेश खरे, www.24taas.com, नाशिक

 

नाशिक शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये निवडणूक काळात तेहतीसहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मतदान मोजणीदरम्यान वीसहून अधिक झाल्यानं अनेकजण जामिनासाठी न्यायालयात तर काही जखमी उमेदवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. निवडणुकांतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी मुद्यावरुन झालेली लढाई आता गुद्यांवर आल्यानं राजकीय गुन्हेगारी रोखण्यात पोलीस यंत्रणा जुंपली आहे.

 

बिहारलाही लाजवेल अशा पद्धतीनं नाशिकमधील गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर इथल्या गुन्हेगारीनं उच्चांक गाठला आहे. निवडणूक काळात शहरातल्या विविध पोलीस स्टेशनमध्ये तेहतीसहून अधिक गुन्हे झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री पंचवटीतल्या मोगरे कुटुंबियांच्या घराची तोडफोड करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक तीनमधून लढताना कोशिरे आणि मोगरे यांच्यात मते विभागली गेल्यानं मनसेचा उमेदवार निवडून आला. त्यामुळं चिडून जात एकमेकांवर हल्ले करत घर फोडण्यात आलं. याप्रकरणी कोशीरे गटातील लोकांना अटक करण्याच्या मागणीसाठी मोगरे कुटुंबीय तक्रार करत आहेत.

 

आतापर्यंत अंबडला दिलीप दातीर-निवृती दातीर, नाशिक रोडला धोंगडे-खोले, भद्रकालीत पठाण-शेख, सरकारवाडा पोलिसांत कांबळे-कांदे यांच्यातील प्रकरणे हातघाईला आली आहेत. बोगस मतदान करणाऱ्या टोळ्या आणि टोकाला गेलेल्या स्पर्धेतून झालेल्या हाणामारी, तोडफोडीपुढं पोलिसही निष्प्रभ ठरत आहेत.

 

शहरात परस्परविरोधी गुन्ह्याच्या तक्रारीत वाढ होत असल्यानं त्या त्या पक्षाचे नेते अडचणीत आले आहेत. दरम्यान काही गुंडांची तडीपारी झाल्यानं तर काहीजण हाणामाऱ्यांत गुंतल्याने शहरातल्या चेन स्नॅचींग आणि दुचाकी चोरीसारख्या घटना कमी झाल्यानं सर्वसामान्य नाशिककरांची काही दिवस सुटका झाली आहे.