www.24taas.com, झी मीडिया, मेलबर्न
ऑस्ट्रेलियन ओपन या वर्षातल्या पहिल्या ग्रॅँड स्लॅम स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या हार्डकोर्टावर होणाऱ्या या स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचचं आणि अग्रमानांकीत राफेल नदाल यांच्यात वर्चस्वाची लढाई रंगणार आहे.
राफेल नदाल दुखापतीमुळं गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियन ओपन खेळू शकला नव्हता. तर नोव्होक जोकोविच या स्पर्धेत तीन वर्षांपासून अजिंक्य आहे. २०१२मध्ये या दोघांमध्ये तब्बल सहा तास रंगलेली फायनल आजही सर्वांच्या लक्षात आहे.
त्याशिवाय ऑस्ट्रेलियन ओपनचं चारवेळा विजेतेपद पटकवणारा रॉजर फेडरर यंदा तरी आपला बॅड पॅच संपवणार का याची सर्वांना उत्सुकता आहे. तसंच विम्बलडन ओपन विजेता एण्डी मरे आणि चेन्नई ओपन विजेता स्टॉनिस्लॉस वॉवरिन्काही विजेतेपदाच्या शर्यतीत आहेत.
तर दुसरिकडे महिला गटात सेरेना विल्यम्सचे पारडे जड आहे. ख्रिस एव्हर्ट आणि मार्टिना नवरातिलोव्हा यांच्या १८ ग्रँड स्लॅम विजेतेपदाची बरोबरी करण्याची सेरेनाला संधी आहे. गेल्यावर्षी ती केवळ पाच स्पर्धा हरली असून यंदाच्या सराव स्पर्धेचंही तिनं विजेतेपद मिळवलंय.
त्यामुळं संभाव्य विजेपदासाठी सेरेनाच पहिली पसंती आहे. माजी विजेत्या मारिया शारापोव्हामध्ये सेरेनाला धक्का देण्याची क्षमता असून मात्र तिनं आपल्या खेळात सातत्य आणण्याची आवश्यकता आहे. तर गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काच्या कामगिरीचीही सर्वांना उत्सुकता असेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.