www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक शहरात पुढच्या सहा महिन्यांत विकास दिसू लागेल, असं आश्वासन दिलंय खुद्द राज ठाकरेंनी... त्याचबरोबर दर महिन्याला नाशिकचा दौरा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. पण नाशिकमध्ये आजवर सत्ताधारी मनसेचा प्रवास पाहता ही आश्वासनं इंजिनाच्या धुरात विरुन जाण्याचीच शक्यता नाशिककरांना जास्त वाटतेय.
नाशिक महापालिकेत मनसेची सत्ता प्रस्थापित होऊन दीड वर्ष उलटलं. या दीड वर्षात महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज साहेबांनी बोटावर मोजण्याइतकेच दौरे केले. आताच्या दौ-यात राज ठाकरेंनी सकाळी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर एकदम विकास होणार नाही, टप्याटप्यानं सगळे प्रश्न हाताळले जातील. सहा महिन्यांत बदल दिसायला लागतील, अशी सगळी आश्वासनं राज ठाकरेंनी दिली. त्याचबरोबर दर महिन्याला नाशिकला भेट देण्याचं वचनही दिलं.
नाशिकमध्ये मनसेची सत्ता आली, त्याहीवेळी राज ठाकरेंनी दर महिन्याला नाशिकमध्ये येण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र विजयोत्सवाच्या गुलालाचा धुरळा खाली बसताच, ते आश्वासनही विरुन गेलं. त्यामुळे आता या नव्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा, असा प्रश्न नाशिककरांना पडलाय.
नवनिर्माणाची अनेक स्वप्नं मनसेनं नाशिककरांना दाखवली.. पण आजपर्यंत त्यातली बरीचशी फक्त स्वप्नंच आहेत. आता आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यातली किती स्वप्नं खरी होणार, आणि राजसाहेब नाशिककरांना दिलेल्या आश्वासनांना जागणार का, हा खरा प्रश्न आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.