www.24taas.com,नाशिक
सिंधुदुर्ग पाठोपाठ नाशिक शिवसेनेतला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आलाय. विद्यमान जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्यावरील नाराजी उफाळून आलीय.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांनी करंजकर यांच्यावर टीका केलीय. त्यांच्या कार्यपद्धतीवर बागुल यांनी टीकास्त्र सोडलंय. जिल्हाप्रमुख नेमताना चूक झाल्याचा आरोप बागुल यांनी केलाय. शिवाय यावेळी त्यांनी संपर्कप्रमुख आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवरही टीका केलीय.
वरच्या नेत्यांना मँनेज करण्याची पद्धत नवीन लोकांनी आणलीय. त्यामुळे पक्षाला मरगळ आल्याची उघड टीका त्यांनी केलीय. त्यामुळे सिंधुदुर्गपाठोपाठ नाशिकमध्येही शिवसेनेतील धुसफूस यानिमित्ताने पुढे आलीय.
काल सिंधुदुर्गमध्ये परशुराम उपरकर हे शिवसेना सोडून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु असतानाच आज नाशिकचे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांनी स्थानिक शिवसेना पदाधिका-यांसह थेट वरिष्ठ नेत्यांवर टीकेची झोड उठवलीय.
सिंधुदुर्गमध्ये परशुराम उपरकर यांचे समर्थक शैलेश भोगले आणि जयसिंग नाईक या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी आपल्या पदाचे राजीनामे देत विनायक राऊत, अरुण दुधवडकर आणि वैभव नाईक यांच्यावर जोरदार टीका केली होती. नाशिकमध्ये शिवसेनेत जुना-नवा असा संघर्ष ब-याच दिवसांपासून सुरु आहे. तो आज चव्हाट्यावर आलाय.