www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरात तेरा हजारांपेक्षाही अधिक अनधिकृत बांधकामं आहेत. नाशिक महापालिकेच्या घरपट्टी विभागाची ही आकडेवारी असून नगररचना विभागाचं सर्वेक्षण हे अद्यापही सुरु आहे. मुंब्र्याच्या घटनेनंतर महापलिका प्रशासन जागं झालं असून आता अनधिकृत बांधकामांचा नेमका आकडा किती यावर खल सुरु झाला आहे.
महापलिकेच्या कागदपत्रात ज्या इमारतींची नोंद धोकादायक आणि अनधिकृत अशी आहेत. मात्र शहरातील सुरु असलेल्या अनेक बांधकामाचे अनेक मजले अनधिकृत असूनही त्याकडे नगररचना विभागाचं दुर्लक्ष होतंय. घरपट्टी विभागाच्या सर्वेक्षणानुसार शहरात सुमारे तेरा हजार घरं सध्या अनधिकृत आहेत. शहरातील सात विभागात सातपूरमध्ये 3166 नाशिक रोडपरिसरात 2933 बांधकामं दिसून आली आहेत. म्हणजे ज्यांचे कर नाहीत अशी शहरातील तीन लाख 42 हजार 646 अधिकृत बांधकामं असून 13074 बांधकामं अवैध आहेत.
पूर्णत्वाचे दाखले नसलेल्या अनेक इमारती आज शहरात दिमाखाने उभ्या आहेत. इतकंच नाही, तर अनेक मजले हे अनधिकृतपणे बांधण्यात आले आहेत. अडीचशेच्या आसपास धोकादायक इमारतींना गेल्या सात वर्षांपासून असून केवळ नोटीसा बजावून प्रशासन आपलं काम चोख बजावतंय. नगररचना विभागाच्या अहवालानंतर कारवाई केली जाईल असं महापौरांनी स्पष्ट केलंय.
शहर सीमारेषेत चोवीस खेडे लागून आहेत. त्यांची तर मोजदादच नाही. त्यामुळे जाणकारांच्या म्हणण्यानुसार ठाण्यात आणि नाशिकमध्ये खुपसा फरक नसल्याची चर्चा नाशिकमध्ये रंगली आहे. एखाद्या खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण केल्यास हा आकडा पन्नास हजारांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.