www.24taas.com, धुळे
दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.
भविष्यातली वैरण टंचाईची चाहूल राज्य आणि केंद्र सरकारला लागली आहे. त्यामुळे राज्यातील तालुक्यांमध्ये जनावरांच्या चा-यासाठी वैरण विकास कार्यक्रमाला गती देण्यात आली आहे. दुधाळ आणि ओढ काम करणाऱ्या जनावरांना चारा उपलब्ध न झाल्यास दुध आणि कृषी उत्पादकतेवर त्याचा प्रतिकुल परिणाम होईल. इतकेच नव्हे तर जनावरांची रवानगी कत्तलखान्याकडे केली जाईल. त्यामुळे हे संकट रोखण्यासाठी केंद्रिय वैरण विकास कार्यक्रम आणि राष्ट्रिय कृषी विकास योजने अंतर्गत पशुपालकांना वैरण तयार करण्याचे काम पशु संवर्धन विभागाकडून केलं जातंय. ज्वारी, मका पिकांची बियाणी जास्तीत जास्त वाटुन मोठ्या प्रमाणात वैरण तयार करण्याचे काम पशु संवर्धन विभागाकडून केलं जातंय. वेळप्रसंगी शेजारील तालुके अथवा जिल्ह्यांना त्या वैरणांचा लाभ घेत यावा असे नियोजनही या वैरण विकास कार्यक्रमात करण्यात आला आहे.जिल्ह्यातल्या 6 हजारपेक्षा जास्त पशुपालकांच्या चा-यासाठी हे मोफत बियाणे वाटले जाणार आहे.
या वैरण विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात दहा हजार टनापेक्षा जास्त चारा उत्पादित केला जाणार आहे.शेतक-यांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला तर पशुधनासाठी येणा-या संकटावर वेळीच मात करण्यास मदत होणार आहे.